शोधतो गेली कुठे ती झुंजणारी माणसे!
रक्त देशास्तव स्वत:चे सांडणारी माणसे!!
गाव हे मुर्दाड दिसते, कोण जाणे का बरे....
शोधतो मी बोलणारी, चालणारी माणसे!
देशसेवेचीच नुसती झूल येथे पाहिली....
फक्त स्वार्थास्तव स्वत:च्या पेटणारी माणसे!
वाटली परकीच, नव्हता एक सुद्धा आपला....
पाहिली जवळून सारी भेटणारी माणसे!
लौकिकाला केवढे देतात ते मोठेपणा.....
पाहिली मी फक्त नाती तोडणारी माणसे!
एकही शुद्धीत नव्हता, मी कुणाशी बोललो?
आपल्या नादात निव्वळ झिंगणारी माणसे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY