श्रावणाची सर स्मृतींची येउनी बरसून गेली!
आणि सुकलेल्या उन्हाला चिंब ती भिजवून गेली!!
ती झुळुक आली असावी अगंणामधुनी सखीच्या....
गंधअभिसारामुळे नस आणि नस तरसून गेली!
त्या गुलाबी गतक्षणांचे चांदणे घेऊन आली.....
श्वास अन् तो श्वास माझा पौर्णिमा उसवून गेली!
ती नजर अगदी निसटती आणि ओझरतीच होती....
मात्र जाताना किती कोडी मला घालून गेली!
जागणा-या लोचनांना शेवटी आलीच निद्रा....
आणि माझी रात्र स्वप्नांनीच ती सजवून गेली!
एक वेडी आस मजला गझल ती लावून गेली....
जन्मभर डोळ्यांस माझ्या आणि ती खिळवून गेली!
ते न रे चक्रीय वादळ वा न झंजावात होता....
एक हलकीशी झुळुक मजला अरे, उडवून गेली!
प्रथम भेटीतच तिच्या प्रेमामधे मी कैद झालो.....
कोवळी ती प्रीत माझी जिंदगी बदलून गेली!
एक तो वा-याबरोबर वाहणारी धूळ होता.....
पण, परागांसारखे त्याला झुळुक रुजवून गेली!
जिंदगी माझी शहाणी अन् किती सोशीक होती....
वंचनांचे वीष सुद्धा लीलया रिचवून गेली!
काजवे काही स्मृतींचे सोबतीला येत होते....
वाट काळोखातलीही त्यामुळे उजळून गेली!
फरक गगनाला न पडला, मात्र मी व्याकूळ झालो..
मध्यरात्री तारका माझीच का निखळून गेली?
जिंदगी माझी न होती अमृताचा एक प्याला....
मात्र प्रीती, अमृताची माधुरी मिसळून गेली!
वाट मी पाहून थकलो आणि रुसलोही तिच्यावर...
शेवटी आली नि ती माझी कळी खुलवून गेली!
पोचलो साठीत तेव्हा ही मला जाणीव झाली....
की, जवानी माझिया हातातुनी निसटून गेली!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY