पाखरांपरी पहा माणसे करू लागली स्थलांतरे....
पाठीवरती बि-हाड त्यांच्या, पुन्हा एकदा नवी घरे!
चोचीमध्ये चारा त्यांच्या...भार शिरावर स्वप्नांचा!
डबडबत्या डोळ्यांनी घेती निरोप सा-या नात्यांचा!!
बालवयाचे, तरुणपणाचे क्षण सोडोनी जाताना.....
तुटे आतडे, एकेका त्या आठवणीने रडताना!
पुन्हा एकदा नवा प्रांत अन् नवे शहर ये वाट्याला!
पुन्हा एकदा काडी काडी जुळवत लागे कामाला!!
चिमणा जातो दूर....घराच्या कामासाठी जोमाने!
राबराबते चिमणी फिरुनी घरात नवख्या प्रेमाने!!
क्रमश: ...............
भाग....2
पुन्हा एकदा त्या वार्तेची वीज नभी बघ कडाडली....
पुन्हा एकदा तेच स्थलांतर, तीच वेळ दारी आली!
पुन्हा एकदा चिमणा चिमणी बावरले अन् गांगरले.....
क्षणात काही पण दोघेही हा हा म्हणता सावरले!
एक नवे चैतन्य पिलांच्या अंगी सुद्धा संचारे!
चिमणाचिमणीच्या संगे ती करू लागली ये जा रे!
गोड गोड बोलणे, कधी तर, प्रेमाने हे दटावणे....
पुन्हा तेच संवाद, विनंत्या,चिमणा चिमणीचे जगणे!
कुठली वस्तू घ्यावी अन् कुठली सोडावी प्रश्न पडे....
वस्तू वस्तूमधे गुंतला जीव, जिवाला रडू फुटे!
पुन्हा बाचकी संसाराची क्षणात ती नटली थटली!
पुन्हा नजर उरले का काही म्हणून घरभर भिरभिरली!!
पुन्हा निरोपाचा क्षण तो दारावरती बघ चक्क उभा...
पुन्हा सजल डोळे नात्यांचे, स्नेहाचे ते जाताना!
डबडबलेले डोळे पुसुनी सावरले चिमणा चिमणी!
सुरू जाहले तेच स्थलांतर आनंदी चिमणा चिमणी!!
क्रमश: ...............
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY