सूर्यकिरणे जणू आसवांसारखी.....
बरसती आज का सांत्वनांसारखी?
सूर्य कवटाळतो या निशेला असा......
भेट ती दोन वाटे जिवांसारखी!
थक्क झाली पशू, पाखरे, श्वापदे!
माणसे वागती माणसांसारखी!!
पांडवांसारखी माणसे ती म्हणे.....
आज का वागती कौरवांसारखी?
शिकवताना असा रोज पान्हावतो.....
पोरटी वाटती वासरांसारखी!
लेकरे आज झालीत मोठी किती!
दूर...गेली पहा पाखरांसारखी!!
एक तारांगणासारखे मन तुझे....
लुकलुके हर स्मृती तारकांसारखी!
जाणतो हेल, भाषा जगा मी तुझी....
दर्शनी फक्त ती कौतुकांसारखी!
वेदना तू दिलेली जरी बोचरी....
अंतरंगात जपली फुलांसारखी!
टाळता येत नाहीत स्मरणे तुझी....
ती जणू माझिया सावल्यांसारखी!
जिंदगीची चढण जीवघेणी जरी;
वाटली ती मला पाय-यांसारखी!
उत्तरे तू दिली सर्व प्रश्नांस, पण....
उत्तरे सर्व ती संभ्रमांसारखी!
जंगलेही बरी....शहर होते असे!
माणसे हिंडती श्वापदांसारखी!!
गच्च भरलीत डोळ्यांमधे आसवे!
पापणी तू उघड सांडव्यांसारखी!!
राग, संशय मनातील गेलाच ना....
तो व ती दर्शनी जोडप्यांसारखी!
माणसांचा भुकेला तरी एकटा...
माणसे भेटली सापळ्यांसारखी!
वेचुनी वेचुनी फेकले का मला?
आज माझी दशा कंकरांसारखी!
नाव सत्संग अन् आड ही विकृती!
अन् तरी भीड ही मेंढरांसारखी!!
सारखे वाटते....काय आलीस तू?
बघ निनादे हवा पैंजणांसारखी!
या मनाची अवस्था अशी जाहली.....
पडझडी जाहलेल्या घरांसारखी!
देव देतो हरेकास संधी अशी....
दर्शनी जी दिसे संकटांसारखी!
वेड टीव्हीतल्या मालिकांचे किती!
लोक जगतात ही... मालिकांसारखी!!
फक्त चर्चेत सामान्य माणूस तो....
बोलणी जाहली भाषणांसारखी!
कोण जाणे किती जीव गिळले तिने?
ती दरी वाटते अजगरांसारखी!
जिंदगी प्रश्न कित्येक पुसते मला....
तू मला वाटते उत्तरांसारखी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY