स्वप्नांची तुडवीत जंगले, युगे युगे मी चालत आहे!
सत्याचा एखादा रस्ता, अजूनही मी शोधत आहे!!
हर यात्रा होवो हजयात्रा! हीच कामना हृदयी माझ्या;
अशाचसाठी मी पापाचा विचार सुद्धा टाळत आहे!
या गर्दीला कुठे माहिती, एकाकीपण कशास म्हणती?
विरहव्यथेचा वणवा मजला, क्षणाक्षणाला जाळत आहे!
वठलेल्या झाडास विचारा, पानगळीचे दु:ख काय ते;
पूर्वी पाने ढाळत होते, आता अश्रू ढाळत आहे!
कितीक दु:खे आली गेली, नुरली त्यांची कुठे निशाणी;
दु:ख तुझे, पण; अहोरात्र मी हृदयाशी कवटाळत आहे!
हसू चेह-यावर ठेवोनी वाट आसवांना केली मी,
कळू दिले ना कोणालाही, काय काय मी सोसत आहे!
काय हवे नेमके कळेना, इच्छांचे भारे डोक्यावर;
पळभरचे सुख मिळवायाला जो तो नुसता धावत आहे!
रानफुलांची व्यथा समजली बागेमधल्या कळ्याफुलांना;
हरेक व्यक्ती कुंतलामधे फुले कागदी माळत आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY