स्वप्ने तरी चितारू, इतके तरी करू!
आधी स्वत: सुधारू, इतके तरी करू!!
पोचायचे कसे? ते, पुढचे पुढे बघू.....
पत्ता प्रथम विचारू, इतके तरी करू!
म्हण वाघ, वाघदादा....द्रवणार काय तो?
भय एकदा झुगारू, इतके तरी करू!
नव्हते म्हणायचे ‘हो’, म्हटलेत ‘हो’ तरी!
आता जरा नकारू, इतके तरी करू!!
देईल हात, नाही देणारही कुणी....
पण, एक हाक मारू, इतके तरी करू!
हा आंधळा किनारा, त्यातून वेंधळा!
त्याला पुन्हा पुकारू, इतके तरी करू!!
वाटून काय घेता येतात वेदना?
पण, शल्य तर निवारू, इतके तरी करू!
नुसतेच भूमिपूजन थाटात जाहले!
पाया तरी उभारू, इतके तरी करू!!
वठलो जरी कितीही, निष्पर्ण जाहलो....
पण, आतुनी फुलारू, इतके तरी करू!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY