Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

तसबीर जशी धुरळावी, मी तसे मळवतो कपडे!

 

 

तसबीर जशी धुरळावी, मी तसे मळवतो कपडे!
बदलतो हार फोटोचा, मी तसे बदलतो कपडे!!

 

उडतेच धूळ शब्दांची, माखतोच मी निदेने;
बाहेर पडायापूर्वी, मी रोज झटकतो कपडे!

 

पायघोळ होती तेव्हा, दुमडतो मनाची वस्त्रे!
जखडल्यासारखे होते, तेव्हाच उसवतो कपडे!!

 

एरव्ही कसाही असतो पेहराव अंगावरती;
करकरीत कोरे जेव्हा असतात......मिरवतो कपडे!

 

ऎपतीप्रमाणे घेतो, निगुतीने अन् वापरतो;
का जगास वाटत आहे?....मी किती गुधडतो कपडे!

 

काळजी घेवुनी सुद्धा, पडतात डाग पानांचे;
चुकवून नजर पत्नीची, मी रोज भिजवतो कपडे!

 

मापेच बदलती माझी! करणार काय तो शिंपी?
परवडत नसोनी देखिल, दरवर्षी शिवतो कपडे!

 

कुठलाही कपडा माझा, मज आता होतच नाही!
मी वेळ साजरी करतो, अन् तेच दडपतो कपडे!!

 

माझे कपाट भरलेले...ना होणा-या कपड्यांनी!
खुश बोहारीणच होते, मी तिलाच विकतो कपडे!!

 

धांदलीत आयुष्याच्या, बसतातच काही हिसके!
दररोज रफू करतो मी....दररोज टाचतो कपडे!!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ