तिच्या मी चंद्रकोरीच्या कलांना पाहतो आहे!
तिच्या मी पौर्णिमेमध्ये पहा ओथंबतो आहे!!
निथळते चांदणे आहे, पहा चोहीकडे कैसे......
तिच्या वेणीतले तारे निसटते, वेचतो आहे!
तिच्या त्या भरजरी पदरावरी तारांगणे दिसती.......
तिचा मधुचंद्र रूपाचा मला भंडावतो आहे!
धरेवर मी उभा, ती पाहते वाकून मज ऐशी.........
नभीचा चंद्र पुनवेचा जणू ओणावतो आहे!
मलाही धुंद होऊ दे तिच्या लावण्यबहराने........
तिच्या गंधोत्सवामध्येच वारा झिंगतो आहे!
तिला वाटे, जणू हलते, घराचे दार वा-याने........
तिला सांगू कसे? की, मी इथे घोटाळतो आहे!
तिला कळणार तर नाही....तिला मी पाहतो आहे!
तिच्या चुकवून मी नजरा, तिला न्याहाळतो आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY