तू फूल हो, तुझी मी होईन फूलदाणी!
दुनियेत घमघमू दे माझी-तुझी कहाणी!!
गंधोत्सवात माझ्या सामील जाहला तो....
शिंपे वसंत सुद्धा माझे गुलाबपाणी!
नुसताच वाचतो ना, जगतो अरे, तुक्या मी.....
आयुष्य हे तुक्याची होवो अभंगवाणी!
माझे-तुझे कधीही जमणार सूत नाही....
जितका हुशार तू, मी तितकाच रे, अडाणी!
झालीच राज्यक्रांती, सरला जुलूम सारा....
जुलुमामुळेच जनता झाली खरी शहाणी!
अश्रूंस धीर माझ्या द्याया रुमाल आहे.....
ही एकमेव आहे उरली तुझी निशाणी!
इथुनी पुढे खरे तर आहे सुरू कहाणी.....
इतक्यात का तरळते डोळ्यांमधील पाणी?
मी काय, आज आहे, माहीत ना उद्याचे.....
पण, गुंजतील माझी सर्वत्र हीच गाणी!
कुठल्याच वेदनांची कुरबूर मी न केली....
म्हटले न मी कुणाला....छळते मला फलाणी!
गेलीस येउनी तू, तात्काळ जाणले मी....
हे चांदणे विखरले वाटेत ठिकठिकाणी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY