तूच श्वासातून माझ्या वावरावे!
मी अहोरात्री फुलावे, मोहरावे!!
झिंग दोघांना मिठीची एक यावी....
तू मला अन् मी तुला मग सावरावे!
लांबणा-या सावलीसम मी सरावे....
ऊन्ह कलते त्यापरी मी ओसरावे!
जिंदगी माझी, अमानत ईश्वराची....
मी तिचे बावनकशी सोने करावे!
बोलताना भान शब्दांचे असावे....
शब्द असते शस्त्र जपुनी वापरावे!
खूप भिरभिरलास वा-यासारखा तू....
पाहुनी आता निवारा तू ठरावे!
मी चुरा आहे तुझ्या त्या चांदण्याचा....
तू मला येऊन जातीने भरावे!
व्याप ज्याचा त्यास हा आधीच असतो....
आपले आपण पसारे आवरावे!
बंद पडलेल्या घड्याळासारख्या त्या....
चालताना, बोलताना मी मरावे!
तूच पाझरतेस या हृदयात माझ्या....
तेच माझ्या लेखणीमधुनी झरावे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY