तुझा घाव हा तर अलंकार माझा!
मला वाटतो तो पुरस्कार माझा!!
तुझा शब्द अन् शब्द झेलीत आलो!
तुझ्या हर सवालास होकार माझा!!
थिटे, तोकडे लोक सामान्य आम्ही!
तुझ्या थोरवीला नमस्कार माझा!!
मला गोंदले काळजाकाळजाने!
किती लाघवी, गोड सत्कार माझा!!
झळाळू जसे लागले शब्द माझे....
कळाला जगाला चमत्कार माझा!
कशी पावले हाय, जातात तेथे?
जिथे चाललेला तिरस्कार माझा!
कधीचेच मी सोडले सावलीला....
स्वत:वर अजब हा बहिष्कार माझा!
दणाणू जसे लागले शेर माझे.....
अता मान करती गझलकार माझा!
उभा जन्म हा वाहला शायरीला!
अता मान्य करतात अधिकार माझा!!
न तो पिंड माझा.....न ती वेळ आली......!
कधी पाहिला सांग फुत्कार माझा?
गुरूला प्रथम वाकुनी वंदतो तो!
कसा फोल जाईल संस्कार माझा?
न आले मला बाद करता कुणाला.....
न हातात आलाच चौकार माझा!
कुठे जाउनी पोचला शेर माझा?
न तो शेर....तो एक षट्कार माझा!
न हे शब्द, ही स्पंदने काळजाची!
निनादेल हृदयात झंकार माझा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY