तुझे तेच माझेही गुंजन!
तुझे नि माझे एकच स्पंदन!!
काय तुझे अन् माझे नाते?
सहाण मी, माझे तू चंदन!
वेसण तू आहेसच माझी.....
हवेहवेसे हे तर बंधन!
अहोरात्र या मनात माझ्या.....
तुझीच मूर्ती करते नर्तन!
अजून अधरांवरी हुळहुळे.....
पहिले वहिले अपुले चुंबन!
ओढ तुझी या नसानसांना!
पेशी पेशी करते क्रंदन!!
तुझीच लीला घडोघडीला!
लवून करतो तुलाच वंदन!!
जन्मच माझा पवित्र झाला!
तुझीच आर्ती, तुझेच अर्चन!!
रात्रंदिन चालूच राहते.....
तुझ्या जपाचे हे आवर्तन!
ध्यानधारणा तुझीच करतो!
हृदयाचे होते संमार्जन!!
खोल खोल काळजात चाले.....
तुझे मनन अन् तुझेच चिंतन!
तुझ्या कृपेची श्रीमंती ही!
जगास दिसतो वरुनी निर्धन!!
तिन्हिसांजेच्या कातर वेळी.....
तुझ्या स्मृतींचे होते सिंचन!
संसाराच्या गाड्यासाठी.....
आपुलकीचे लागे इंधन!
का सोनेरी जिणे न व्हावे?
मला लाभले तुझेच कंचन!
ठेच लागते दूर....तुला अन्;
हृदयी माझ्या होते कंपन!
म्हणून आले जिणे बेतता....
तूच मला शिकविलेस कर्तन!
जगास ही वाटते शायरी.....
मी तर करतो तुझेच कीर्तन!
सर्वांचे बोलून जाहले....
की, मी करतो खंडन-मंडन!
हवा पावसाळी ही नुसती.....
न एकही सर, नुसते गर्जन!
दोष कसायाचा ना काही.......
कसायास का द्यावी गर्दन?
या नेत्यांचा नसे भरोसा!
जसे बोलणे तसे न वर्तन!!
रोज खेळती धुळवड नेते.....
जो तो करतो नुसते तर्जन!
कधी कोयना, कधी किलारी.....
अलीकडे हादरते दख्खन!
तो साकारे चराचराला!
निराकार जो एक निरंजन!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY