तुला हासुनी बघणे, इतके अवघड नाही!
मला खरेदी करणे, इतके अवघड नाही!!
गोड जरासे बोल, आणि ने, काळिज माझे......
पहा तरी, मज खुडणे, इतके अवघड नाही!
शिशिर चालला, मान्य, गळोनी गेली पाने......
पुन्हा आतुनी फुलणे, इतके अवघड नाही!
एक एक क्षण, जिवंत होतो, समोर येतो.......
स्मरुनी तर बघ, स्मरणे, इतके अवघड नाही!
पाषाणाही, फुटतो पाझर.....हवी आर्तता!
प्रसन्न कोणा, करणे, इतके अवघड नाही!!
घिसाडघाई नको, कितीही, असेल गुंता........
निगुतीने उलगडणे, इतके अवघड नाही!
जन्मोजन्मीची पुण्याई, तुझी नि माझी.......
दुनियेला हे कळणे, इतके अवघड नाही!
पहा कधीची, झुळूक घोटाळते भोवती.......
तुला फुला! दरवळणे, इतके अवघड नाही!
नकोच प्रौढी, अहंकार अन्, नको मीपणा......
आपखुशीने हरणे, इतके अवघड नाही!
तुझे नि माझे, असे वेगळे, उरले कोठे?
तुझ्यातला ‘मी’, बघणे, इतके अवघड नाही!
हवा व्हायला, जिंदादिल, माणूस खरोखर.......
रेशिम नाते, जुळणे, इतके अवघड नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY