उगा स्वप्न भलते चितारू नये!
पुढ्यातील संधी नकारू नये!!
नकारातही गोडवा पाहिजे....
दुखावून कोणा झुगारू नये!
जरी फूल देता न आले तरी;
दगड मात्र कोणास मारू नये!
कमी-जास्त होतेच या जीवनी;
सुगीच्या क्षणांनी फुशारू नये!
कुणाची नको द्रुष्ट लागायला.....
कधी एवढेही फुलारू नये!
कपाळी तुझ्या जे, तसे व्हायचे....
विधीलेख कोणा विचारू नये!
हिरावून स्वप्ने कुणाची कधी;
सुखाची इमारत उभारू नये!
जगाला जगाचे कमी व्याप का?
अवेळी कुणाला पुकारू नये!
स्वत:ला बदलणे कधीही बरे!
जगाला कधीही सुधारू नये!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY