उरातली मशाल पेटवून बघ!
हरेक माणसास चाचपून बघ!!
भुलू नकोस या चकाकण्यावरी...
हरेक तू झळाळ पारखून बघ!
गझल नव्हेच, फक्त मंत्रस्नान ते....
गझल खरीखुरीच मंतरून बघ!
मुशीत आपल्याच तापवून बघ....
स्वत:च ओळ ओळ पालखून बघ!
हटून एक ओळ बैसली किती....
सुचेल दिव्य ओळ, गुणगुणून बघ!
टळेल हुंदका तुझा....करून बघ!
मनातल्या मनात तो गिळून बघ!!
किती सुरेख हे जिणे स्वत:च बघ...
जरा मनास मोकळे करून बघ!
बरीच पायपीट जाहली तुझी....
स्वत:स एक आसरा करून बघ!
हरेक माणसास आपलेच कर....
हरेक माणसाकडे हसून बघ!
अलौकिकास चाख एकदा तरी.....
स्वत:स सार दूर अन् जगून बघ!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY