वहावत जन्म हा गेला, मला मी रोखले नाही!
प्रवाहाच्या विरोधाचे मला भय वाटले नाही!!
जराही राखले नाही कधी मी हातचे काही....
दिलेले दान मी वापस कधीही घेतले नाही!
कधी पाने गळाया लागली कळलेच ना मजला....
शिशिर आला कधी? पाऊल त्याचे वाजले नाही!
कितीदा येउनी गेले अरे, दारात सुख माझ्या....
कधी मी बोललो नाही, कधी ते बोलले नाही!
अताशा जात मी नाही कुणाच्या मैफिलींमध्ये....
भले वाटो कुणाला की, मला बोलावले नाही!
अरे, जात्याच मी श्रावण, किती वर्षाव मी केला....
करंटे भोवती होते, कुणी ओथंबले नाही!
हवा मक्ता म्हणे त्यांना, 'जमिन' त्यांची म्हणे आहे
कुणीही रोप एखादे कुठेही लावले नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY