वाणीस जोवरी या, ती धार येत नाही.......
कुठलीच वाचवाया, तलवार येत नाही!
वळचण सुनी सुनी ही.....करते किती प्रतीक्षा!
होईल यार ऐसा, शेजार येत नाही!!
वयही उतार झाले आहे म्हणा अताशा........
येते स्मृती परंतू अनिवार येत नाही!
बहुतेक ताण नाही, तारांमधे पुरेसा........
हृदयातुनी हवा तो झंकार येत नाही!
चुकले कुठे कळेना, रुसला असा कसा तो?
हल्ली हशीखुशीने, का यार येत नाही?
मी चिडचिडाच झालो की, काय कोण जाणे.....
आता घरात माझ्या अरवार येत नाही!
(अरवार म्हणजे लहान मूल विशेषत: खोडकर मूल)
बहुतेक भोग माझे येतात आड सारे......
अधरांवरी गझल का, अरुवार येत नाही?
(अरुवार म्हणजे खुसखुशीत/हलकीफुलकी)
रुसलीत काय आता, माझ्यावरी फुले ही?
कुठलाच वार आता अलवार येत नाही!
(अलवार म्हणजे नाजुक/कोमल)
मी हिंडतो कधीचा, वस्तीमधून इथल्या.......
उघडे सताड कुठले का दार येत नाही?
काहीच हातचे ना राखून ठेवतो मी........
शब्दांस का तरीही, ती धार येत नाही?
दशके कितीक गझले! मी जाळलीत माझी.........
अद्यापही पुरेसा अधिकार येत नाही!
प्रत्येक श्वास माझा, अनिवार शेर होतो!
त्याच्यात आड केव्हा, संसार येत नाही!!
तपलो असा जणू की, साक्षात सूर्य झालो........
माझ्या दिशेस कुठला, अंधार येत नाही!
(तपणे म्हणजे तळपणे)
केली हयातभर मी, ही पायपीट नुसती........
स्वप्नांकडून कुठल्या, होकार येत नाही!
अडतात शब्द ओठीं, गझलेतले असे का?
का सूर कोणताही सुकुमार येत नाही?
(सुकुमार म्हणजे कोवळा/नाजुक)
बाजारभाव ज्याला, येई न ओळखाया.......
मदतीस त्यास कुठला, बाजार येत नाही!
आतून पाहिजे ते, सौंदर्य जीवघेणे!
शृंगारशास्त्र पढुनी, शृंगार येत नाही!!
तू भांडवल भलेही, केलेस खूप गोळा.......
व्यवहारशून्यतेने व्यापार येत नाही!
हा तामसीपणा अन् मस्तीच घात करते.........
सात्वीकतेमुळे रे, आजार येत नाही!
हृदयात शायरीचा खजिना उगाच नाही!
कष्टांशिवाय हाती, कोठार येत नाही!!
आधी गझल शिकावी, अंगात बाणवावी!
गझलेमधे फुकाचा, संस्कार येत नाही!!
(संस्कार म्हणजे पवित्रता/ शुद्धीकरण/ ठसा वा परिणाम)
केले तुझ्या हवाली, आयुष्य पूर्ण माझे.......
खांद्यावरी जिण्याचा अधिभार येत नाही!
सारी धुरा दिली मी, हातात बायकोच्या........
पुरुषास नीट करता, संसार येत नाही!
भांडारपाल अवघा, आहेस तू अखेरी.......
सरणावरी बरोबर, भांडार येत नाही!
(भांडारपाल म्हणजे स्टोअरकीपर)
चिंता नको उद्याची, अनुताप कालचाही........
क्षण जो निघून जातो....माघार येत नाही!
(अनुताप म्हणजे पश्चात्ताप)
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY