वसंत मजला छळतो आहे!
पानगळीसम गळतो आहे!!
अध्यात्माच्या जात्यावरती.....
विज्ञानाला दळतो आहे!
अगम्यही उलगडते आहे.....
मला अता मी कळतो आहे!!
मला काय ही चिता जाळते?
कधीचाच मी जळतो आहे!
कशास लाऊ बोल कुणाला?
मला मीच तर छळतो आहे!
किती मुलायम माझ्या गझला.....
जो तो बघ, विरघळतो आहे!!
उतार वय खुरडते परंतू.....
पुढे पुढे मी पळतो आहे!
भुरभुरतो तो वा-यावरती.....
पदर तुझा मज छळतो आहे!
पान नव्हे मी पिकलेले, पण....
झुळकीने मी गळतो आहे!
लागणार ना चाहुल माझी.....
पेल्यातच वादळतो आहे!
समूह तो सोडला तरीही....
एक किडा वळवळतो आहे!
नजर अता कोठे ही खिळली.....
तोच पदर हा ढळतो आहे!
शेर मनातच जुळतो आहे.....
तंबाखू मी मळतो आहे!
तुझी ओढणी काय बिलगली.....
रोमरोम हुळहुळतो आहे!
अळमटळम ती करीत बसली.....
इकडे मी तळमळतो आहे!
तसा सूर्य मी गझलेमधला......
अलीकडे काजळतो आहे!
मला अडव पापण्यांत तुझिया.....
पहा कसा ओघळतो आहे!
हृदयरोग प्रेमाचा वाढे......
तसा तसा साकळतो आहे!
कळू न देता कानांना मी.......
कुंडलांपरी रुळतो आहे!
प्रथमोपचार तरी कर जरा......
मी वेडा भळभळतो आहे!
तुझ्या बटांना कळले बहुधा.....
मीच अता झुळझुळतो आहे!
आरपार तो कटाक्ष गेला......
युगे युगे कळवळतो आहे!
चुरगाळू लागलो पहा मी.......
खरेच का मी रुळतो आहे?
नजरेचे चुंबन पळभरचे....
जन्मभरी हुळहुळतो आहे!
मोट स्मृतींची होतच नाही.....
किती तरी आवळतो आहे!
मनोगते स्पर्शांची म्हणती.....
तिचा देह सळसळतो आहे!
तुझी प्रीत अंकुरली हृदयी....
म्हणून मी दरवळतो आहे!
काम दिल्यासारखेच अगदी......
जो तो नुसता पळतो आहे!
डोळ्यावर का मीच येतसे.....
हरेकजण का, जळतो आहे?
काय दबदबा! काय दरारा!
समोरचा चळचळतो आहे!!
जरी मला पाहिले न कोणी......
कळते....मी दरवळतो आहे!
बुरूज आहे दिसायला मी......
मनातुनी ढासळतो आहे!
तुझा डौल, नखरा अन् मुरका......
मलाच छळ छळ छळतो आहे!
अस्ताचल नजदीकच माझा.....
हळूहळू झाकळतो आहे!
एक कडा उत्तुंग जरी मी......
क्षणार्धात कोसळतो आहे!
गारपीट कोसळते आहे.....
मळा किती हळहळतो आहे!
तुझ्या विड्याचा ओघळ मी तर.....
हळूहळू ओघळतो आहे!
दूर दूर...मी उगवत आहे!
जरी इथे मावळतो आहे!!
कळ हृदयी जाणारच वेड्या......
अहंकार हा गळतो आहे!
प्रेमामध्ये पडलो तेव्हा.....
अर्थ जिण्याचा कळतो आहे!
मीच कवळतो ज्याला...त्याला....
मलाच जो तो टळतो आहे!
तिच्याच बागेमधील वारा....
दाराशी घुटमळतो आहे!
सरळच आहे हमरस्ता, पण......
मीच वेंधळा वळतो आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY