वाट हरवते फुलांत तेव्हा, काट्यांनाही वाट पुसावी!
वाटसरूने वाटेवरच्या वळणांनाही वाट पुसावी!!
हृदयामध्ये गाणे असले की, जगणेही गाणे होते;
जगणे खडतर होते तेव्हा, गाण्यांनाही वाट पुसावी!
काळजातल्या अमूर्त ओळी अडखळती ओठांवर येता;
अशाच वेळी, गुणगुणताना, शब्दांनाही वाट पुसावी!
चार पावलांवर घर अन् मी हुडकायाला वणवण केली......
थोर मिळाले थोर, अन्यथा पोरांनाही वाट पुसावी!
उशी करावी धरणीची अन् नभ घ्यावे पांघरण्यासाठी;
दिशाभूल करतात दिशा तर....वा-यांनाही वाट पुसावी!
चांदण्यातल्या भेटीगाठी, रुसवे फुगवे, नभही साक्षी;
पुन्हा जायला त्या वळणावर, ता-यांनाही वाट पुसावी!
पैलतीर जाणवतो जीवा, दिशा नेमकी उमजत नाही!
वाटचाल करताना वेड्या, लाटांनाही वाट पुसावी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY