वेड लावते तुझी गुलाबी!
झिंग आणते तुझी गुलाबी!!
गुलाब सुद्धा खजील होतो....
अशी रंगते तुझी गुलाबी!
नखशिखांत तू गोड गुलाबी!
नजर खिळवते तुझी गुलाबी!!
बघणाराही गुलाब होतो.....
गुलाब करते तुझी गुलाबी!
ओंठ नव्हे पाकळ्या गुलाबी!
खुदकन हसते तुझी गुलाबी!!
नजर तुझी घायाळच करते.....
उरात शिरते तुझी गुलाबी!
गूज मनाचे सगळे कळते!
सर्व सांगते तुझी गुलाबी!!
फुले माळुनी केसांमध्ये.....
नटते थटते तुझी गुलाबी!
गुलाबकांती अंगावरती.....
गुलाब बनते तुझी गुलाबी!
उठून दिसते रेशिम साडी!
चमक आणते तुझी गुलाबी!!
विचार करतो अजूनही मी.....
काय सांगते तुझी गुलाबी?
किती पांगळी भाषा माझी!
पहात बसते तुझी गुलाबी!!
हृदयामधुनी गझलेमध्ये.....
जणू उतरते तुझी गुलाबी!
ही बघ झाली....गझल पूर्ण ही!
तुला अर्पतो तुझी गुलाबी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY