विशेष काही तरी जहाले जरूर आहे!
हरेक माणूस का असा दूर दूर आहे?
न मी जळालो, असेल ते एक स्वप्न माझे....
पहा निघू लागला गुलाबीच धूर आहे!
कशास टाळू पराभवाची जबाबदारी?
कुणी न दोषी, समस्त माझा कसूर आहे!
उभ्या हयातीमधे न आलेच ओसराया....
मुळात मी जन्मजात साक्षात पूर आहे!
तमाम आयुष्य झुंजलो मी उगा उन्हाशी....
अरे, इथे सावलीच माझी फितूर आहे!
तमाम गझला, समस्त गीते, किती रुबाया....
उधळउधळतो, खरेच तो दानशूर आहे!
कुणास नव्हती फिकीर माझ्या कधी व्यथांची.....
विदेश माझे नशीब, मी कोहिनूर आहे!
खुलेच डोळे कलेवराचे अजून सुद्धा....
सखीस भेटायला किती हा सबूर आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY