या! नवे डाव मांडू चला लोकहो! आज संकल्प सोडू नवे!
भाग्यशाली नवे वर्ष आले पहा, आस कोरी नवी पालवे!!
कुंचल्याने नव्या, चित्र काढू नवे, स्वप्न बेतू नव्याने पुन्हा....
अंबरी सूर्य आला, फुलू लागले कैक रंगांतले ताटवे!
काळज्या, यातना, वंचना, वेदना....दूर होतील सा-या अता....
गच्च आभाळ चैतन्यकिरणांमुळे....सूर्य करतो खुले सांडवे!
कोवळ्या कोवळ्या या उन्हाने धरा नाहते और अभ्यंग ही.....
अंग पुसते धरेचे झुळुक मंदशी गीत गाती खगांचे थवे!
झुळझुळू लागले चौदिशांना झरे, गात आनंदगाणे जणू;
अन् नदी वाजवू लागली बासरी, ताल देती तरूही सवे!
एक आनंदउत्सव सुरू जाहला...या धरेचा, नभाचा नवा.....
सूर्य साक्षीस त्या उत्सवाला उभा, क्षितिजही जाहले ओणवे!
लोकहो या, नमू काळचक्रास या, ओळखू पावले ही नवी....
हात देऊ चला एकमेकांस अन् ही पुराणी पुसू आसवे!
वर्ष झाले सुरू आज झोकामधे....बदलली आज दिनदर्शिका !
लोकहो या, करू कूच आता पुढे...झितिज गाठू चला नवनवे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY