ऐकतो की, काळ सुद्धा थांबुनी तिज पाहतो!
काढुनी कारण तिच्याशी, आज मीही बोलतो!!
लगडले आपादमस्तक, केवढे सौंदर्य हे!
चोरुनी नजरा तिच्या, जो तो तिला न्याहाळतो!!
खोलण्या सोपी न ती ऐसी तिजोरी वाटते!
घेउनी जोखीम ही, शृंगार का हा हिंडतो?
कनवटीला लावुनी चावी सरळ ती हिंडते.....
चोरचावी खुद्द परमेश्वर स्वत: ती ठेवतो!
पाहिला एकेक मदनाचाच पुतळा, जो तिच्या.....
पाहुनी स्वर्गीय सौंदर्यास माथा टेकतो!
मोकळे ते केस जेव्हा लहरती वा-यावरी......
एक गंधोत्सव जणू चौफेर रंगू लागतो!
भाग्य सा-या दागिन्यांचे उजळले हे केवढे!
तो हि-यांचा हार सुद्धा केवढा आनंदतो!!
काय ठसका, काय आहे डौल अन् नखरा तिचा....
ताटवा वाटेतला एकेक तिजला पाहतो!
पाहुनी अधरातली लाली, फुलेही लाजली!
सूर्य मावळाता तिची लाली खुबीने चोरतो!!
लागली फुलपाखरेही भिरभिराया भोवती.....
लुकलुकोनी एक तारा बघ, तिला न्याहाळतो!
लाज लेण्यांनाच वाटू लागली तिज पाहुनी!
ताजमहलाचाच मुखडा केवढा ओशाळतो!!
कैक नजरा लागल्या पाहू तिच्या मुखड्याकडे......
जो पहातो, तो किती, घायाळ वाटू लागतो!
त्या कटाक्षाला सु-याची धार आहे केवढी!
जाणुनी सुद्धा कसा, जो तो उरी तो झेलतो?
सळसळे काटा गुलाबी, पावले पडता तिची......
पाहणारा एकटक नुसताच पाहत राहतो!
गर्व रूपाचाच ज्याला, जाहला गपगार तो.....
ठेवुनी बाजूस ताठा, हात त्याचे जोडतो!
अप्सरा स्वर्गातल्याही लागल्या पाहू तिला......
स्वर्ग सच्चा या धरेवर थाटलेला वाटतो!
ती म्हणे शौकीन आहे शायरीची, ऐकतो.....
शेर जो तो ऐकवायाला तिला बघ पहातो!
ती सहज गच्चीवरी फिरण्यास आली काय अन्........
चंद्र आकाशातला येऊ धरेवर पाहतो!
भाग्यशाली केवढा तो आरसा आहे अरे!
एकटा डोळेभरोनी सारखा तिज पाहतो!!
नागमोडी चाल ऐशी, वाटते नागीण ती......
कैक हृदयांचा भुगा वाटेत होऊ लागतो!
ज्या कुणाशी बोलते, त्याची कळी खुलते किती!
बोलण्यासाठी तिच्याशी तो कसा बघ धावतो!!
फक्त एका फुंकरीने ती जखम करते बरी.....
ऐकल्यापासून हे, जो तो जखम बघ दावतो!
पाहिले नाही कुणीही एवढे सुंदर कुठे......
मी तिला शोधायला तारांगणे ओलांडतो!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY