गीत कुठलेच आज म्हणवेना!
काय झाले? मलाच समजेना!!
काय माझे असे हरवलेले?
मन कशातच मुळात लागेना!
आज शुद्धीत मीच रे, नाही.....
जग मला आपलेच वाटेना!
आज माझी मला खबर नाही.....
काय बोलू? मलाच समजेना!
हा कशाचा विषाद मज ग्रासे?
कारणे कोणती तरी दे ना!
वासना कोणतीच होईना.....
घास कुठलाच आज खावेना!
मी जिथे काल, आजही तेथे.....
जिंदगी थांबलीच, सरकेना!
कालची गझल, आज भावेना!
गुणगुणावे खरेच वाटेना!!
साद आली म्हणून घुटमळतो!
रात्र झाली, अता तरी, ये ना!!
राहिली वाटते चिमुट जैसी.....
जो हवा तोच स्वाद लागेना!
हे दिवसही निघून जाणारे!
सांगते मन, शरीर ऐकेना!!
-------प्रा. सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY