चिता पेटता दूर कुणाची त्याला मी आरास लिहू?
सरणावरच्या ठिणग्यांना का आतिषबाजी खास लिहू?
सांग कसा मी भरू गोडवा सांग कशी तारीफ करू,
जीवन म्हणजे कडू कारले त्याला मी हापूस लिहू?
कडू जहर हि ओळ व्यथांची सांग कशी शेरात लिहू,
माय ढाळते अश्रू त्याला अभिनय खासमखास लिहू?
रोज पेटते दंगल तिजला जगण्याची मी रीत कहू,
ऊर धपापे रोज भीतीने त्याला का मी श्वास लिहू?
कुणी गाळतो घाम शिवारी कुणी चाखतो साय इथे,
कुस्करलेल्या स्वप्नांना मी पक्वानांचा घास लिहू?
पाण्यासाठी रक्त सांडते त्याला का पाणीच लिहू,
तडफडणा -या भूकबळींना स्वेच्छेचा उपवास लिहू?
कर्जाचा यमपाश तयाला कळयाफुलांचा हार म्हणू,
शेतक -यांच्या गळफासाला मुक्तीचा विश्वास लिहू?
कुणी काढतो जात कुणाची कुणी कापतो मान इथे,
राजरोस हि घरे पेटती त्याला मी आभास लिहू?
बुलडोझरने घरे पाडती बोल "शिवा " मी काय करू,
स्मशानातल्या कबरींना का जनतेचा आवास लिहू?
पहा पेटल्या लक्ष मशाली विझवून त्यांना भाट बनू,
पेनीमध्ये पाक भरूनी देशाचा इतिहास लिहू?
- शिवाजी घुग
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY