दैवास मत्त आता कुरवाळण्यास जावे,
किंवा अटीतटीने झगडावयास जावे !!
गुलजार चेह -यांना सजवेल रे कुणीही,
विद्रूप नागड्यांना सजवावयास जावे !!
जमली पुन्हा नव्याने दु: खे सभोवताली,
हसवून आज त्यांना फसवावयास जावे !!
आयुष्य घास आहे कडव्या हलाहलाचा,
समजून तू मिठाई चघळावयास जावे !!
आहे बधीर दुनिया ती एैकणार नाही,
कापून जीभ अपुली दरडावण्यास जावे !!
शेंदूर लागला अन होवून "देव " गेला,
ही गोष्ट कातळाला सुनवावयास जावे !!
गावात छान जागा मिळतील रे कितीही,
-हदयात एक जागा बळकावण्यास जावे !!
आपापल्या ठिकाणी जो तो व्यथीत आहे,
कोणी कुणास आता समजावण्यास जावे !!
लिहितो अशी कशी रे 'तकदिर ' ईश्वरा तू?
कोणीतरी तयाला धमकावण्यास जावे !!
- शिवाजी घुगे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY