दूर कुठेही जावू जेथे कुणीच नाही,
चूर कुठेही राहू जेथे कुणीच नाही !!
कळ्या - फुलांचे धुंद ताटवे फक्त सभोती,
तेथे मुक्त विसावू जेथे कुणीच नाही !!
निर्मनुष्य त्या पर्वतरांगा साद घालती,
त्या शिखरांवर धावू जेथे कुणीच नाही !!
जिथे नांदते तृप्त शांतता लोभसवाणी,
गीत मुक्याने गावू जेथे कुणीच नाही !!
कड्या - साखळ्या, भिंत - कवाडे नको कुंपणे,
मुक्त चांदण्या पाहू जेथे कुणीच नाही !!
जिथे उसळती गंध फुलांचे मंद तिथूनी,
श्वास मोकळा घेवू जेथे कुणीच नाही !!
हवी कशाला देव - देवळे ऊंच सभोती,
ध्यान फुलांवर लावू जेथे कुणीच नाही !!
उंच कड्यावर विशाल पोळे मधमाशांचे,
डंख मजेने साहू जेथे कुणीच नाही !!
जिथे उभी कुंवार जंगले किलबिलणारी,
खोल तळाशी जावू जेथे कुणीच नाही !!
जिथे विलसती कमलसरोवर अन जलधारा,
दाट धुक्याने न्हावू जेथे कुणीच नाही !!
गजबजलेल्या दुनियेपासून दूर कुठेही,
मस्त कलंदर होवू जेथे कुणीच नाही !!
- शिवाजी घुगे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY