रुपयेच मला खातांना कुरणावर कळले होते,
श्रेष्ठींनी केली सुटका मिडीयाने छळले होते ।।
हि दुनिया दलबदलूंची बोलून बदलली नाही,
मी बहर इथे नोटांचे हलकेच उधळले होते ।।
खाल्लेल्या ब्लँकमनीचा इतिहास गडे विसरूया,
पचलेले घास कधी का माघारी वळले होते ।।
मी एैकविली दुनियेला नाठाळ जगाची भाषा,
मी गांधींच्या तत्वांना चुपचाप वगळले होते ।।
हयाचेच हसू आले कि फसले सगळे रडण्याला,
मी रंग लुचाटगिरीचे अश्रूंत मिसळले होते ।।
सीमा मोडून शरमेच्या जनतेवर प्रेम मी केले,
मी कैक अजाण मुलींना उचलून कवळले होते ।।
घर माझे बांधाया मी परदेशी वणवण केली,
सोन्याचा वर्ख विटांना लावून मढवले होते ।।
नव्हतीच कधीही माझी प्रतिमा उत्तूंग तरीही,
मी नाव बड्या नेत्यांच्या यादीत घुसडले होते ।।
बँनर आपुल्या प्रतिमेचे लावता विरोधी नेता,
रात्रीतून बँनर माझे चौकात लटकले होते ।।
सत्तेच्या डावामधले पत्ते मी फेकत गेलो,
मी कैक खुळ्या चमच्यांना उचलून पटकले होते ।।
नुकतीच नव्याच मुलीशी एकांती गुणगुण झाली,
नुकतेच नव्या कबरीला मी रंग चढवले होते ।।
वाटेल तसे अकलेचे तारे मी तोडत होतो,
मी बोलत असता श्रोते सारेच खवळले होते ।।
मी एकटाच एकांती वेगाने जेवत होतो,
मी वकलो तेंव्हा कळले देशास मी गिळले होते ।।
(स्व.सुरेश भटांच्या रचनेवर आधारीत भ्रष्ट पुढा -
यांचा समाचार घेणारे विडंबन काव्य.)
-शिवाजी घुग
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY