रात अघोरी ढळते आहे संथपणाने,
जाग नकोशी छळते आहे संथपणाने ।।
दैवगतीच्या मुठीत आहे सुरी व्यथांची,
मानेवरती फिरते आहे संथपणाने ।।
कुणास ठावूक राख जाहली कितीक स्वप्ने,
चूल मनाची जळते आहे संथपणाने ।।
बांध घालतो डोळ्यांना पण थांबत नाही,
याद तुझी झुळझुळते आहे संथपणाने ।।
स्वप्नांना गिळण्याची तिजला नाही घाई,
नागीन वेढा कसते आहे संथपणाने ।।
नको! नको!! ती म्हणते आहे अजाण छाया,
शेज तरीही सजते आहे संथपणाने ।।
रात रात मज झोप कशी ती लागत नाही,
स्वप्न कुणी चुरगळते आहे संथपणाने ।।
लुकलुकती हे दीप अंगणी केवीलवाणे,
साय तमाची चढते आहे संथपणाने ।।
कुणीच नाही इथे कुणाचे कुणीच नाही,
रोज नव्याने कळते आहे संथपणाने ।।
जीवन म्हणजे मशिन आहे ऊसरसाची,
सांजसकाळी पिळते आहे संथपणाने ।।
-शिवाजी घुग
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY