उगाच साला शल्य जगाचे टोचून घेतो,
रोज सकाळी पेपर ताजा वाचून घेतो !!
पेडन्यूजचा विळखा घेवून सकाळ होते,
त्याच बातम्या तेच चेहरे पाहून घेतो !!
खून, दरोडे, बलात्कार, गळफास, दंगली
कारण नसता दु: ख फुकाचे भोगून घेतो !!
भूकबळींची तुफान गर्दी दहा दिशांनी,
क्रिकेटचा जल्लोश तरीही साहून घेतो!!
ठावूक आहे संपादक हा नोकर आहे,
तरी परंतू विचार त्याचे जोखून घेतो !!
अटीतटीने चाल खेळती मत्त पुढारी,
धमक्या, प्रत्यारोप,आरोळ्या मोजून घेतो !!
आजकाल हा पेपर म्हणजे धंदा झाला,
मद्य - बिडीची जाहिरातही छापून घेतो !!
मराठमोळा वाचक मोठा चतूर आहे,
पेपर वाचत असता डोळे झाकून घेतो !!
— शिवाजी घुगे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY