वा-यासोबत हुंदडतो जो तोच कवी जाणावा,
स्वप्नांसोबत बागडतो जो तोच कवी जाणावा ।।
मद्यासोबत दुनिया सारी फेसाळून जाते,
दु:खांसोबत वादळतो जो तोच कवी जाणावा ।।
रुक्ष कोरडी दुनिया म्हणजे नुस्त्या चैत्रझळाया,
अश्रूंसोबत ओघळतो जो तोच कवी जाणावा ।।
गोळ्या चाखत वावरतो जो त्याला षंढ म्हणावे,
गोळ्या झेलून कोसळतो जो तोच कवी जाणावा ।।
दारे- खिडक्या बंद करूनी लपतो माणूस साधा,
दुष्टजणांना खुंदळतो जो तोच कवी जाणावा ।।
शब्दांचा गोंगाट करावा उपटसुंभ लोकांनी,
मौनामधुनी ओरडतो जो तोच कवी जाणावा ।।
लाख उत्तरे उभी भोवती त्याला एक मिळेना,
कारण नसता गोंधळतो जो तोच कवी जाणावा ।।
सुळकाट्यांना अंथरतो जो तोच खरा मानावा,
चंद्र नभीचा पांघरतो जो तोच कवी जाणावा ।।
कीस पाडतो शब्दांचा जो त्याला भाट म्हणावे,
अवघे जीवन मंतरतो जो तोच कवी जाणावा ।।
-शिवाजी घुगे.
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY