विवंचनांच्या कढईमध्ये तेल अफाट उकळते आहे,
प्रत्येकाचे नशीब त्याला उलटेसुलटे तळते आहे!!
काळया शाईने सटवाई झाडाझडती लिहून जाते,
धुवा कितीही साबण लावून भाळ तरीही मळते आहे!!
काट्यांवरती जरी उमलले गालामधुनी हसते आहे,
कारण नसता हसणारे ते फूल मनाला छळते आहे!!
बाज टाकूनी चांदणराती अंगणात मी निजलो आहे,
चंद्रप्रभेच्या नितळ छटांनी दु: ख मनाचे ढळते आहे!!
अंगणातल्या फुलझाडाला जणू चांदणे लगडून गेले,
भल्या पहाटे फांदीवरूनी अलगद खाली गळते आहे!!
छताजवळच्या जाळीमध्ये चिवचिवतो चिमण्यांचा खोपा,
किलबिलण्याने त्यांच्या माझे मौन अजून उजळते आहे!!
माझ्यासोबत फुलराणी ती वेडी होवून बहरत गेली,
माझ्यासोबत तीचे जागणे कवितेतून दरवळते आहे!!
देवाघरची फुले मुले ही बागडती मनसोक्तपणाने,
अवतीभवती त्यांचे असणे रक्तातून मिसळते आहे!!
चिंचा,बोरे,बँट,बाहुली,चेंडू,कै -या मला खुणवती,
"बालपणीचे दिवस सुखाचे! " फार उशीरा कळते आहे!!
पाऊस होता ऊन कोवळे ऊन संपता मेघ सावळे,
इंद्रधनुच्या पार्श्वभूमीवर वीज पुन्हा सळसळते आहे!!
दिवसांमागून दिवस चालले शिल्लक हाय! घसरते आहे,
आयुष्याच्या तोटीमधुनी धार क्षणांची गळते आहे!!
- शिवाजी घुगे...
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY