शालेय मुलांसाठी एक सर्वोत्तम निबंध संग्रह
निबंध हा आधुनिक गद्यलेखनाचा एक प्रकार असून, 'निबंध' या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यांपैकी 'एकत्र बांधणे' किंवा 'रचणे' हे अर्थ या लेखन प्रकाराशी अधिक जुळते मिळते आहेत. एकेकाळी भूर्जपत्रांवर लेखन केले जाई व अशी भूर्जपत्रे एकत्र करून बांधत. एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध, असे म्हणता येईल. अगदी छोटे गद्यलेखन टीपा, टिप्पणी किंवा टिपण म्हणता येईल. अगदी मोठे लेखन व्याप्ती लेख, प्रबंध वा ग्रंथही म्हणता येईल. व्याप्तीदृष्ट्या या दोहोंच्या मध्ये कुठेतरी निबंध हा प्रकार बसू शकेल. एखाद्या विषया संबंधी प्रतिपाद्या समाधानकारकपणे कसे मांडता येईल, यावर लेखनाची व्याप्ती अवलंबून असते. त्यामुळे टिपा -टिपाणे आणि प्रबंध - ग्रंथ या दोहोंमध्ये कुठेतरी बसणाऱ्या निबंध लेखनातही ठराविक व्याप्ती आढळत नाही. काही निबंध लहान, तर काही दीर्घ असू शकतात. लेखना मागील उद्दिष्टही त्याची व्याप्ती तसेच ठेवण या घटकांवर परिणाम करतेच. टीपा-टिपणे, निबंध, प्रबंध, ग्रंथ यांसारख्या प्रत्येक लेखन प्रकाराचा घाट लेखन विषयक भूमिकेवर अवलंबून असतो.
संस्कृतमध्ये गद्यपद्यात्मक ग्रंथरचनेला सामान्यपणे प्रबंध असे म्हटले जाते. पुढे आख्यानात्मक अथवा कथात्मक काव्याला प्रबंधकाव्य म्हटले जाऊ लागले. आधुनिक परिभाषेत सामान्यपणे पीएच्. डी. साठी केलेल्या संशोधनात्मक लेखनास प्रबंध म्हटले जाते. संस्कृतात निबंध ही संज्ञा असली तरी, आधुनिक अर्थाने जी निबंधरचना अभिप्रेत आहे ती संस्कृतात नाही. पश्चिमी साहित्यात निबंध हा लेखनप्रकार सोळाव्या शतकाच्या शेवटीशेवटी उदयास आला. त्याचा जनक माँतेन (१५३३-९२) हा फ्रेंच लेखक मानला जातो. इंग्लिशमध्ये 'एस्से' अशी संज्ञा आहे व ती फ्रेंच संज्ञेवरून आलेली आहे. एस्से या संज्ञेचा शब्दश: अर्थ 'प्रयत्न करणे' असा आहे. इंग्रजीमध्ये निबंधवजा गद्यलेखनाला 'काँपोझिशन', 'आर्टिकल' अशाही संज्ञा आढळतात. पूर्वी 'डिस्कोर्स' असाही शब्द वापरत. इंग्रजीतील 'ट्रीटिज' संज्ञेला मराठीत प्रबंध म्हटल्याचे दिसते व तिची व्याप्ती निबंधाहून मोठी असते. इंग्रजीतील 'मोनोग्राफ' या प्रकारातील लेखनही एखाद्या विषयावरील संक्षिप्त पण सर्वांगीन माहिती देणारे असते. मराठीत त्याला व्यक्तिलेख असे सामान्यपणे म्हटले जाते. इंग्रजीत 'रिसर्च पेपर' (शोध - निबंध किंवा शोध - लेख) हाही गद्यलेखनाचा प्रकार असून तो संशोधनविषयक प्रतिपादनास लावण्यात येतो.
माँतेनप्रणीत निबंधात लेखकाच्या आत्माविष्काराला किंवा आत्मनिष्ठेला प्रधान्य होते. तथापि बेकन सारख्या लेखकांनी इंग्रजीत जो निबंधप्रकार रूढ केला, तो अधिक वस्तुनिष्ठ, विश्र्लेषणात्मक आणि तर्कशुद्ध मांडणीचा होता. सामान्यपणे आपण ज्याला निबंध म्हणतो, त्यात एखाद्या विषयाचे वस्तुनिष्ठ दृष्टीने केलेले विवेचन महत्त्वाचे असते. आत्मनिष्ठ निबंध हा माँतेनने स्वत:च म्हटल्याप्रमाणे, लेखकाच्या आत्मचित्रणा सारखा असतो. माँतेनच्या या आत्मनिष्ठेच्या बीजाचाच विकास पुढे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लघुनिबंध, ललित निबंध, काव्यात्म निबंध किंवा गद्य काव्य यांच्या स्वरूपात झाला. इंग्रजीत या प्रकारास 'पर्सनल एस्से' म्हणतात. पश्चिमी साहित्यात आत्मनिष्ठा आणि वस्तुनिष्ठा या दोहोंचे प्रभाव निबंधलेखनावर सारख्याच प्रमाणात राहिल्याचे दिसून येते. अब्राहम काउली, बेकन, मेकॉले, कार्लईल, जी. के. चेस्टरटन, सॅम्युएल जॉन्सन, स्टील, अँडिसन, चार्ल्स लँब, ए. जी. गार्डनर अशी इंग्रजी साहित्यातील निबंधकारांची परंपरा पाहिली, तरी तीत हे दोन्हीही प्रकार प्रभावी राहिल्याचे आणि पुष्कळदा एकमेकांत मिसळून गेल्याचे दिसून येते.
निबंध म्हणजे 'तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले सिद्धांत साधार सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव, अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना’. तथापि, ही व्याख्या निबंध, प्रबंध, ग्रंथ या सर्वच प्रकारांचा अंतर्भाव करणारी आह. वरील लक्षणांनी युक्त अशी २०/२५ पृष्ठांपर्यंतची रचना म्हणजे निबंध, त्याहून मोठी रचना (३००-४०० पृष्ठांपर्यंतची) म्हणजे ग्रंथ व या दोहोंच्या मध्ये बसणारा प्रकार म्हणजे प्रबंध होय.
वरील व्याख्येनुसार विचार प्रतिपादन किंवा विचार प्रर्वतन करणे हा निबंध लेखणाचा हेतू असतो, असे दिसेल. व्यापक अर्थाने या हेतूच्या पूर्ततेसाठी एखादा विषय घेऊन त्या विषयाची अंगोपांगे आणि अर्थपूर्णता विशद करण्याचा प्रयत्न निबंधकार करतो. निबंधाला अर्थातच अविषय असा कोणताच नाही. अगदी तात्कालिक किंवा प्रासंगिक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी वृत्तपत्रातून येणारे संपादकीय लेख किंवा इतर लेख यांनाही निबंध म्हणता येतील. साहित्य समीक्षात्मक लेखही निबंध म्हणता येतील. राजकीय, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, तात्विक, वैज्ञानिक विषयांवरील एका विशिष्ट मर्यादेत विवेचन करणारे लेखही निबंध म्हणता येतील. वैचारिक पातळीवर असा काही विषयांचा परामर्श घेतला जातो, त्याच प्रमाणे व्यक्ति विषयक शब्दचरित्रेही निबंध म्हणता येतील. विनोदी लेख हेही एका दृष्टीने विनोदी निबंधच ठरतात. तेव्हा निबंध प्रकारात विषयाला कसल्याच मर्यादा नसतात; कोणत्याही विषयाची तर्कसंगत, सप्रमाण, वस्तुनिष्ठ अशी मध्यम स्वरूपात केलेली मांडणी निबंधात महत्त्वाची असते. अशी मांडणी अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरू शकते. उदा., निबंधाचा मथळा, त्याचा प्रारंभ, त्यातील मुद्दे, उदाहरणे वा दाखले, आलंकारिकता, खंडनमंडनाची वा युक्तिवादाची पद्धत, विनोद स्थळे इत्यादी. निबंध शीर्षके आकर्षक व अर्थपूर्ण असावीत.
उपोद्घात-उपसंहारवजा मजकुरांनी निबंधातील विवेचनाचा अनुक्रमे परिचय व सारांश देण्याचा प्रयत्नही काही निबंधात आढळतो. दीर्घ निबंधात उपसंहाराची वा सारांशनिवेदनाची जोड दिल्यास वाचकाच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरते. निबंधाला खरा घाट त्यातील मुद्देसुद मांडणीमुळेच लाभतो. एखाद्या विषयाच्या अंगोपांगांची क्रमाक्रमाने उकल करीत जाणारा व लेखनाचे प्रतिपाद्य परिणामकारकपणे मनावर ठसविणारा निबंध स्वत:चा एक स्वयंभू घाट धारण करीत असतो. तथापि केवळ विषयाच्या अंगोपांगांची संयुक्तिक उकल करून हा घाटप्राप्त होईलच असे नाही; तर त्याला ओघवते प्रतिपादन, त्यातीलसुबोधता व सुस्पष्टता, मार्मिक दृष्टांतादी अलंकार, चपखल युक्तिवाद, नर्म विनोद स्थळे, वेधक भाषाशैली, विचाराचा नवीन्य व एकूण अभिव्यक्तीचे स्वारस्य इत्यादींनी डौल प्राप्त होतो. या सर्वांचा परिणाम म्हणून निबंधाला विचार सौंदर्याचा घाट प्राप्त होतो.
निबंध साहित्यात निबंधकाराच्या व्यक्तिमत्त्वालाही अर्थातच महत्त्व असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याने निवडलेले विषय, त्यांची केलेली मांडणी आणि त्याची भाषाशैली यांवर उमटलेला असतो. याचा अर्थ निबंध हा प्रकृतीने वस्तुनिष्ठ लेखनप्रकार असला, तरी त्यात लेखकाच्या आत्मनिष्ठेचे दर्शन सूचकपणे घडतेच. शैलीसारख्या किंबहुना निबंधातून सूचित झालेल्या मतांसारख्या गोष्टींवरून हे दर्शन घडते. कोणतेही लेखन हे पूर्णपणे वस्तुनिष्ठ असणे अशक्य आहे. अगदी ऐतिहासिक वा वैज्ञानिक विषयांवरील लेखनही, अल्प प्रमाणात का होईना, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे निदर्शक ठरते.
आधुनिक निबंधसाहित्य हे गद्यातच असते. तथापि गद्यसाहित्याचा उदय होण्यापूर्वी सगळेच लेखन पद्यातून होत असे. आपल्याकडे महाभारतातील राजधर्मासारखे शांतिपर्व प्रकरण हे पद्यातील निबंधसाहित्य म्हणता येईल. रामदासांनी लिहिलेली काही प्रकरणे उदाहरणार्थ राजधर्म, सेवकधर्म यांचे स्वरूप स्थूलमानाने निबंधवजाच म्हणता येईल. इंग्रजीत अठराव्या शतकात अलेक्झांडर पोप या कवीने 'अँन एस्से ऑन क्रिटिझम' व 'अँन एस्से ऑन मॅन' या नावांच्या कविताच लिहिलेल्या आहेत व त्यांत विचार प्रर्वतनालाच महत्त्व आहे. तेव्हा गद्य आणि पद्य ही माध्यमे निबंधाच्या हेतूशी संवादी असली, तरी प्रत्यक्षात मात्र निबंध साहित्य प्रकाराचा सोळाव्या शतकानंतरचा जो इतिहास आहे, तो गद्यातील निबंधा संबंधीचाच आहे.
निबंध साहित्याचा उदय पश्चिमेकडे सोळाव्या शतकाच्या अखेरीस झाला. आधुनिक भारतीय भाषांत इंग्रजी भाषा साहित्याच्या परिचयाने एकोणिसाव्या शतकात हा प्रकार रूजला. ज्या परिस्थितीत निबंधप्रकार उदयास आला, तिचा विचार करून काही विचारवंतांनी निबंध साहित्या मागील जीवनविषयक प्रवृत्ति-प्रेरणांचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. धार्मिक श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने एखादा विषय प्रतिपादन करण्या ऐवजी बुद्धीवादाने, तर्कशुद्ध रीतीने, शास्त्रीय पद्धतीने व लौकिक भूमिकेने त्या विषयाचा मागोवा घेणे ही आधुनिक दृष्टी निबंध साहित्या मध्ये असते, असे म्हटले जाते. शब्द प्रामाण्या ऐवजी बुद्धिप्रामाण्य, समाजा बरोबर व्यक्तीचे मूल्य; पारमार्थिक निष्ठेऐवजी इहलोकनिष्ठा यांचा पुरस्कार करण्याची प्रवृत्ती निबंध साहित्याच्या मुळाशी आहे, असे म्हटले जाते. याचे प्रत्यंतर आधुनिक भारतीय भाषांतील निबंध साहित्या वरून येऊ शकते. प्रबोधनाचे सगळे प्रश्नोपप्रश्न भारतीय निबंधकारांनी आपल्या निबंधातून हाताळलेले आहेत. त्यामागे एक आधुनिक दृष्टीकोन आहे. आधुनिक निबंध साहित्य पाहिले, की त्यामागील इहलोकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, तार्किक सुसंगती, व्यक्तिवाद तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारखी आधुनिक जीवनमूल्ये यांचे अधिष्ठान लक्षात येते.
निबंध वाङमयाला उतरती कळा लागली आहे, असा एक आक्षेप घेतला जातो. निबंध याऐवजी लेख, निबंध संग्रहा ऐवजी लेखसंग्रह अशा संज्ञा रूढ होत चालल्या आहेत. स्वत:ला निबंधकार म्हणवून घेण्यापेक्षा, समीक्षक, विचारवंत किंवा विचारवंत लेखक म्हणवून घेणे अधिक पसंत करण्यात येत आहे. तथापि, संज्ञेचा आग्रह सोडला तर, निबंधाची जी बुद्धीवादी, सप्रमाण, तर्कसंगत विवेचन करण्याची प्रकृती आहे, ती लेख किंवा लेखसंग्रह यांत टिकून असल्याचे दिसून येईल.
समाजाला वैचारिक पातळीवर नाना विषयांची सप्रमाण माहिती आणि दृष्टी पुरवणारा निबंध हा प्रकार म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. शालेय जीवनात निबंधलेखन आणि वक्तृत्वाचा सराव झाल्यास त्यानंतरच्या स्पर्धात्मक जीवनव्यवसायांतही त्याचा उपयोग होऊ शकतो. हे लक्षात घेऊन नामवंत वक्तृत्व स्पर्धां मधील आणि निबंध स्पर्धां मधील उत्कृष्ट ठरलेल्या डॉ. कुमार पाटील द्वारा लिखित विद्यार्थ्यांच्या निबंधांचा उत्कृष्ट संग्रह प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांनी कविता सागर प्रकाशना मार्फत प्रकाशित केला आहे. निबंध संग्रह दोन भागांत असून निबंध संग्रहाचा पहिला भाग 'संवाद' या नावाने वाचकांच्या हातात पोहचला असून त्यामध्ये विविध विषयावर १९ निबंध आहेत, संवाद पुस्तक एक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना उपयोगी आहे, निबंध संग्रहाचा दुसरा भाग 'सुसंवाद' या नावाने लवकरच बच्चे कंपनीच्या सेवेत येत आहे.
विविध स्तरांवर आयोजित होणा-या वक्तृत्व व निबंध स्पर्धां मध्ये विषयांचेही वैविध्य असते. हे निबंध व भाषणे प्रत्यक्ष तेथे जाणा-यानाच अनुभवता येतात. डॉ. कुमार पाटील यांच्या संवादने ती निबंध व भाषणे सर्वांसाठी उपलब्ध करून आणखी एक उद्देश साध्य केला आहे. संवाद हे त्याच्या साहित्यिक दर्जामुळे प्रत्येक विद्यार्थी आणि सामान्य वाचकांसाठीही संग्रहणीय असे ठरले आहे.
पुस्तकाचे नाव संवाद लेखक डॉ. कुमार पाटील
आवृत्ती प्रथम ISBN 978-81-926535-2-5
प्रकाशक डॉ. सुनील पाटील प्रकाशन कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर
पृष्ठे 68 (कव्हर सह) आकार 1/8
मुल्य 60/- विषय निबंध संग्रह
वर्गवारी शैक्षणिक संपर्क 02322 - 225500, 9975873569, 9595716193
sunildadapatil@gmail.com,sunil77p@rediffmail.com
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY