’तुम्ही माझे जिव्हाळ्याचे’ असे मी मानले होते
दुरावा वाढण्यामागे कुणाचे साधले होते..?
ㅤ
विषारी ही हवा आहे, सुकावा श्वास कंठाशी,
विसरलो, मीच सापाच्या पिलांना पाळले होते..
ㅤ
लपू शकणार ना चोरी कधी नजरेतली त्यांच्या
जरी त्यांनी विवादाचे पुरावे जाळले होते..
ㅤ
तुझे वारे, तुझ्या लाटा, सुकाणूही तुझ्या हाती,
किनारा मीच निवडावा असे का वाटले होते..?
ㅤ
भले तू आज विरहाचा दिलेला शाप मी जगतो
कधी माझ्याच हातांना गळा तू माळले होते..
ㅤ
तुझी चाहूल आल्यावर कधी विचलीत ना होणे
असे माझे मला कितिदा वचन मी तोडले होते...
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ(वियद्गंगा)
- स्वामीजी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY