माणूस काय आहे याचा अंदाज माणसांनाही येत नाही, माणूस ही जातच काहीशी अशी आहे. आयुष्यात कुणी एक माणूस कस वागेल, बोलेल याचे कोणतेही सूत्र नाही. एकंदरच माणूस म्हणजे एक गूढ आणि अनाकलनीय प्राणी आहे. याच माणसालाही माणसाचे न कळलेले गूढ सोडवण्याचा केलेला एक प्रयत्न म्हणजेच जयंत बेंद्रे यांचा ‘माणसं आणि माणसं’ हा कथासंग्रह. पूर्वी काही कथास्पर्धांतून पारितोषिक विजेत्या कथांचा हा संग्रह आहे. किशोर चिटणीस, प्रशांत देशमुख, ययाती, सुवर्णा आदी पात्रांच्या रूपकातून वेगवेगळ्या स्वभावांच्या माणसांचा लेखकाने यात वेध घेतला आहे. यातील पात्र ही मध्यमवर्गीय , उच्च मध्यमवर्गीय अशी म्हणजेच समाजात आपल्या आसपास वावरणारीच आहे, त्यांच्या प्रत्येकाची एक कहाणी आहे. गूढ उकलत जाताना नेहमीच वाचक पुढे काय होईल याचा अंदाज वाचक नेहमीच लावत असतात, परंतु त्यांच्या ठोकताळ्यांची माती करत या कथेचा शेवट आपल्या पुढ्यात येतो, अगदी अनपेक्षित असा. कथेतील नायक/ नायिका ह्यांच्या काही बाजू आहेत, चांगल्या वाईट, यातून पात्र कोड्यात टाकत जाते. लेखक सिनेमा नाटकातील नट होते त्यामुळे प्रत्येक कथा ही एखाद्या पटकथेप्रमाणे रंगत आणि बोलत जाते. लेखकही तटस्थ राहत सूत्रधाराचे काम बजावतोच. आपण एखाद्या प्रसंगात रम्य झाले असताना अचानक त्या प्रसंगाला उलटे वळण मिळते आणि वाचक मनाला जरासा हादरा बसतो. कधी नर्मविनोदी, कधी गंभीर, अशा प्रसंगपटलातून कारुण्यतेच्या वळणावर येऊन पात्र कथेचा शेवट घेउन थबकते. माणसाचे गूढ शोधणारा कथासंग्रह उस्तुकता म्हणून वाचाच.
विशाल लोणारी
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY