लेखक : - विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर , म. प्र .
-----------
महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्याच्या माढ तालुक्यातल्या एक खेड , ' टेंभुर्णी ' गावात मराठी साहित्याच्या दृष्टीने, एक फार मोठा अभिनव प्रयोग झाला . मराठीचे आजचे आघाडीचे ख्यात वरिष्ठ साहित्यकार राजन खान यांच्या , ' अक्षर मानव ' पुणे या संस्थेद्वारा पुरस्कृत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहयोगाने व विठ्ठलराव शिंदे कला महाविद्याल , टेंभुर्णी , आयोजित , आगळी वेगळी दोन दिवसीय कादंबरी लेखन कार्यशाळा महाविद्यालयाच्या विठ्ठल सभाग्रहात मार्चच्या १५ आणि १६ तारखेला यशस्वी रित्या संपन्न झाली .
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या साहित्याकारांना ,राजन खान सकट , माढाचे विद्यमान आमदार श्री बबनराव शिंदे , ग्रामीण व आदिवासी जीवनाचे अभ्यासक ,वरिष्ठ साहित्यकार डॉ . द. ता. भोसले , प्रसिध्द कादंबरी लेखक श्री भारत सासणे , व श्री रंगनाथ पठारे , आणि महेंद्र कदम यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यशाळेत विठ्ठल राव शिंदे कला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ . बाळासाहेब दास यांनी आपल्या प्रास्ताविकेत असल्या कार्यशाळेच्या औचित्याबद्दल व उपयोगितेबद्दल प्रकाश मांडला .
८१ वर्षांचे डॉ. द. ता. भोसले यांनी सर्वांनाच प्रभावित केले . टेंभुर्णीत ग्रामीण परिवेश आहे आणि आज ग्रामीण लेखनाचे महत्व वाढले असले , तरी जर का मराठी भाषा श्रीमंत करायची असेल तर ही जवाबदारी लेखकांवरच आहे ,आणि आजच्या एकूण परिस्थितीत तरुणांना योग्य मार्गदर्शनाचीही फार गरज आहे ,म्हणूनच असल्या कार्यशाळा गावागावांतूनच होणे गरजेचे
आहे .जेणे करून उत्कृष्ट प्रकारचे लेखक तयार होऊ शकतील . ते म्हणाले , ' कादंबरी लेखन हा एक आव्हानात्मक प्रकार आहे . कादंबरी अन्य वाग्मयापासून कशी वेगळी आहे ते म्हणजे , फुलांमध्ये कविता ही 'सुंगंध '( अर्क ) आहे , कथा ही ' रंगीत पाकळी ' ( एकाद पैलू ) आहे , नाट्य ही विधा 'रचना ' ( वेध घेणारी ) आहे तर कादंबरी या सर्वांचे दर्शन एकाच वेळी घडविते. एकूण कादंबरी ही फुलान्मधल उल्लास आहे . कादंबरी हा प्रकार सारं जीवनंच शब्दांमध्ये ठेवते . कादंबरी सांगते की टिकाऊ काय आहे आणि टाकाऊ काय आहे . कादंबरी आम्हाला मागून आणून पुढे आणते , आतून बाहेर आणून जगाशी ओळख करविते . कादंबरी म्हणजे जीवनावर दर्शन
घडविणे , त्याच्यावर भाष्य करणे आहे . नवोदितांसाठी त्यांनी कादंबरी लेखनाचे काही उत्तम मंत्र सांगितले . (१) लेखका मध्ये सजीव स्वरुपाची तरल संवेदना हवी , बागेतल्या फुलांचाही ओलावालेखकाला ओळखता यावा . (२) लेखकामध्ये तल्लक प्रकारची कल्पना शक्ती हवी . (३) लेखकाजवळ शब्दांची कमतरता नसावी, आणि असामान्य स्वरूपाचे भाषा प्रवृत्त आणि भाषेतल्या वेगळ्या छटा त्याला कळायला हव्या . (४) घटना व प्रसंगांची नव्या पद्धतीची निर्दोष कलादृष्टी समजण्याची ( इंटरप्रिटेशन ) योग्यता हवी . (५) लेखकाचे व्यक्तिमत्व समृध्द असले पाहिजे , त्याशिवाय त्याच्या कडून समृध्द साहित्याची निर्मिती शक्य नाही .लेखकाजवळ जीवनाची नग्न व भेदक स्वरूपाची पर्याप्त अनुभवदृष्टीही असायला हवी .
(६) कादंबरी मध्ये भूतकाळाचे सत्व , वर्तमानाचे सत्य , आणि भविष्याचे स्वप्न असायला हवे . (७) कादंबरीत मानव , निसर्ग ,आणि समाज यांच्या परस्पर सम्बधांचे उत्तम भाष्य असायला हवे .(८) कादंबरी ही नियती , प्रवृती आणि परिस्थितीचे मिश्रण असायला हवे . (९) कादंबरीकार हा परिस्थितीला शरण जाणारा व परिस्थितीला शरण आणणारा असायला हवा . (१०) दूरदृष्टी, अनुभव आत्मशोधाची परिधि विस्तारित करते आणि अभिव्यक्तीला वळण देऊन परत अनुभवालाच समृध्द करते . नवोदितांना पुढे सल्ला देत ते म्हणाले की नवोदितांनी आंधळं अनुकरण करू नये , कंटाळवाणी विषयवस्तु निवडू नये , तात्कालिक आकर्षण , तात्कालिक उद्देश नसावे व एकूण वास्तविक्तेचा भान ठेऊनच साहित्य निर्मिती करावी .
महाराष्ट्र राज्यशासनाच्या मराठी साहित्य निवड समिती आणि पुरस्कार समितीचे सदस्य मराठीचे वरिष्ठ साहित्यिक आणि प्रसिध्द कादंबरी लेखक श्री भारत सासणे यांनी सहभागी साहित्यकारांना मार्गदर्शन देताना कादंबरी कशी लिहावी हे सांगितलं . ते म्हणाले , ' सर्व प्रथम लेखकाला स्थिर असणं , आणि त्याच्यात एकाग्रता असली पाहिजे . शक्यतो लिखाण हे स्वत:च्या अक्षराने कागदावर असायला हवं . कमप्यूटरवर सृजनशीलता कमी होते . पण हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . अनुभव आणि अनुभूती असायला हवी . तपशील बारकाईने लिहावे . आडनाव , भूगोल , जातजमातीचा उल्लेख शक्य तो टाळावा . विषया नंतर आशय स्पष्ट असायला हवा . सर्वस्वी काल्पनिक असं काहीच नसतं . भाषा आणि निवेदनाची भाषा महत्वाची . निवेदनाची भाषा , लेखकाची भाषा आणि पात्रांची भाषा कधीही एक नसते , त्याचा भान बाळगावा . लेखकाची शैली महत्वाची . लेखकाने स्वत:ची वापरलेली भाषा , आणि जी प्रतीकं पुन्हा पुन्हा तो वापरतो , त्यानेच लेखकाची शैली निर्मित होते . कादंबरी लेखनात
प्रयोगशीलता सतत होत राहिली पाहिजे . विषय मांडणीसाठी या सर्व वरील गोष्टी महत्वाच्या .
तांत्रिक बाबींची गरज , उत्तम विषयवस्तूंची बांधणी उत्तम अभिव्यक्तीसाठी गरजेची असते . विषय मांडत असताना परिवेश स्वाभाविक वाटायला हवे . आशय हा आकाशा सारखा भव्य असायला हवा . पण आशय मांडत असताना निर्मितीच्या कठीण प्रवासातून जावे लागते . आणि चिंतनानंतरच आशय प्राप्त होतो . म्हणून लेखकाने चिंतनशीलता वाढवायला हवी . चिंतनशीलता वाढल्याने नवीन ज्ञान व नवा अनुभवाचा मार्ग सापडतो . ग्रामीण आणि नागर क्षेत्र साहित्य वेगवेगळे नाही , ते साहित्यच आहे , त्यात भेदाभेद करू नये . हे कप्पे योग्य नाही . प्रसिद्धीसाठी वाद निर्माण करू नये कारण त्यांच्यात स्थायित्व नसते . एवढेच नव्हे तर लेखकाने या कप्प्यांच्या पलीकडे जाऊन असतील नसतील ते वाद मिटवून आपल्या साहित्यात माणूस शोधण्याचा प्रयत्न करावा . कोणतेही वाद लेखकाने स्वीकारू नये कारण वाद स्वीकारल्याने लेखक एका सीमा रेषेत आणि मर्यादेत अडकतो . श्री भारत सासणे यांनी सर्वांच्या आग्रहास्तोव त्यांची प्रसिध्द आणि पुरस्कृत कादंबरी, " दोन मित्र " याची पूर्ण निर्मिती प्रक्रिया विस्ताराने
सांगितली .
मराठीचे आणखीन एक प्रसिध्द कादंबरी लेखक श्री रंगनाथ पठारे यांनी विलक्षण पद्धतीने विज्ञानाचा आधार घेत मार्गदर्शन केले . ते म्हणाले , " कोणतीही कला ही आत्मसादरीकरण
संस्था असते . एक शरीरात आत्मसात केलेलं आत्मसादरीकरण आणि एक मनात व बुद्धीत आत्मसात केलेलं आत्मसादरीकरण . शरीरासाठी केलेलं आत्मसादरीकरण समाजाला काहीच देत नाही , उलट व्यवस्थेला अवयवस्थेत बदलतं . मन आणि बुद्धीत आत्मसादरिकरणाची प्रक्रिया
जन्माच्या अगोदरच सुरु होते . माणूस मनात आणि बुद्धीत अनेक मौल्यवान विचार आत्मसात करून व्यवस्था निर्माण करतो . महत्वाचे म्हणजे कलेची प्रतिकृती तयार करता येत नाही , म्हणून कलेच्या निर्मिती साठी मन ( भावना ) आणि बुद्धी ( ज्ञान ) हे आवश्यक आहे . यामुळे मानवीय संस्कृतीला नवे विचार , नवा मार्ग मिळतो . कला ही माणसाचा जगण्याचा आनंद द्विगुणीत करते .
कादंबरी वाचत असताना वाचक लेखकाचा हात धरून चालत असतो , म्हणून वाचकाला गुंतवून ठेवण्यात लेखकाचे कौशल्य असायला हवे . लेखन हे पुन्हापुन्हा मृत्युच्या जवळ पोहचण्याचा अनुभव आहे अर्थात , दु:खाच्या गाभार्या जवळ पुन्हापुन्हा जाणे (टोका पर्यंत पोहोचणे ) हे लेखन आहे . कादंबरी लेखन तितकेसे सोपे नाही . कथा म्हणजे सुबक घाट व कादंबरी म्हणेज चवदार भरलेल्या फळांचे वृक्ष .या फळांचा गंध दाही दिशांना पोहचतो . म्हणून कादंबरीमध्ये विशिष्टता
( युनिकनेस ) हवी , वेगळे पणा हवा . सामन्यातून असामान्यत्वाकडे वळवणारी ही कादंबरी . जगण्याचं आकलन समजाविणारी व जगण्याचं साधन शोधून देणारी ही कादंबरी .
डॉ. महेंद्र कदम यांच्या दोन कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहे . आपले अनुभव सांगताना ते म्हणाले की लेखक असणे हे भन्नाटच असते . इतर माणसे वर्तमान जगून निघून जातात . लेखक वर्तमानावर स्वत:लां आणि जगाला नोद्वतो , त्या नोंदी भविष्यातही टिकून राहतात . कादंबरी लेखन म्हणजे सामाजिक इतिहास नोंदवून ठेवणे , पण यासाठी लेखकाला स्वत:चे आत्मपरीक्षण गरजेचे असते , कारण लेखन हे स्वात:सुखाय प्रक्रिया नसून जवाबदारीची प्रक्रिया आहे आणि लेखकाने ती पेलायला हवी . लेखकाची , परिस्थिती व्यवस्था आणि समाज इत्यादी सर्व नाकारण्याची मानसिकता असली , आणि त्याने किती ही बंड पुकारला , तरी सर्व नाकारल्या नंतर पुढे काय याचा ही शोध लेखकाने घ्यायला हवा . आज जागतिककरणांमुळे मराठी साहित्य थांबलं आहे , कारण त्याची गती कमी आहे आणि वर्तमान तंत्रज्ञानाच्या युगात वाढत्या नव्या विषयांवर लेखन कमी आहे. नवोदितांना सल्ला देत त्यांनी सांगितलं की आपले कादंबरी सारखे महत्वाचे लिखाण त्यांनी अगोदर आपल्या अनेक मित्रांना वाचायला द्यावे . त्यांची प्रतिक्रिया घ्यावी . बदल व सुधारणा करण्याची मानसिकता असायला हवी . पात्रांचा एक नकाशा कागदावर नेहमी समोर असायला हवा , त्यांचा संबध जुळता असायला हवा . पात्रांवर अन्याय करू नये . पात्र आणि प्रसंग किती छोटे किंवा मोठे आहे हे महत्वाचे नसून त्यांचे मुल्य महत्वाचे असते आणि कादंबरीत हेच मुल्य स्थिर राहते .महत्वाचे म्हणजे जिथं कादंबरी संपते , तिथं काही तरी नव्याचे बीज अंकुरण वाटायला हवे . आणि शेवटी कलाकाराला आपल्या निर्मिती नंतर आपल्या रचनेशी अलिप्त होता आलं पाहिजे . कादंबरीकारा साठी हे अति महत्वाचे आहे , नाही तर पुन्हा पुन्हा पुनरावृत्तीची भीती असल्याने पुढे येणाऱ्या साहित्यात नव्याचा अभाव असतो .
दोन्ही दिवस कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रसिद्ध कादंबरीकार श्री राजन खान हे करत होते . आपल्या उद्बोधनात त्यांनी ' अक्षर मानव ' या संस्थेच्या उद्देशावर व कार्यशाळेच्या महत्वावर प्रकाश टाकला . ते म्हणाले , ' माणसाला कादंबरी जगणं शिकवते . म्हणून कादंबरी कार्यशाळा .
माणसांन एकत्रित होणं हे गरजेचं . मराठी माणूस गावोगावी फिरत नाही . आपण आपलं गावचं हे विश्व समजतो . गावोगावी प्रत्येकाचे अनुभवाचे संचित वाढो आणि मेंदूला थोडी सजगता मिळावी , हाच कार्यशाळेचा उद्देश .
माळरानातली व्यथा , वास्तविकता आणि त्यांची जगण्याची पद्धत कळावी , वेगवेगळ्या
गावांचे महत्व कळावे , म्हणून ही कार्यशाळा टेंभुर्णीत आयोजित केली . एका नदीच्या अल्याड पल्याड शैली कशी बदलते , याचा वेध घेण्यासाठी ही कार्य शाळा . तीन पिढीच्या साहित्याचा खेळ बघण्यासाठी ही कार्यशाळा . दोन दिवस नवोदितांना मोठ्या लेखकांच्या बरोबर मुक्त संवाद करता यावा म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . '
कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठल राव शिंदे कला महाविद्यालयाचे मराठी विभागात प्राध्यापक श्री संजय साठे यांनी सर्वांचे आभार मानले . सायंकाळी , सोलापूरच्या ' जवळीक ' या संस्थेच्या कलाकारांद्वारा राजनखान लिखित ' विनशन ' या कादंबरीच्या अभिवाचनाचा ( सादरीकरण ) रंगारंग कार्यक्रम सम्पन झाला . ///// समाप्त //////
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY