आमच्या दुखऱ्या अंगाचं दुखणं
कायमचं जेव्हा थांबेल
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !
आम्ही सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव
कुठलीही गफलत खपणार नाही बघ
तू शंभराहून जास्त जग !
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !
तुझे पोरं म्हणतात ,
मुलांमध्ये मूल होऊन वावरलास तू
आणि वाटू लागलं
जगणं म्हणजे
खरोखर सगळं झटकून
माणसाने पुन्हा मुल बनावं
कुणाच्या तरी कडेवर बसून
सगळं आयुष्य बघावं !
मुलांसारखे आपल्यालाही भाबडे डोळे असावे
सगळं काही समजून - उमजून
आपणही काही काळ भोळे व्हावे
आयुष्याच्या गुंत्याचं हे टोक आम्हाला ही वळू दे
तुझा खांदा आम्हालाही मिळू दे !!
कुणास ठाऊक , काय उरेल पुढे
काय घडवतील आठवणींचे तुकडे
कोण गेले , कोण राहिले ,
कदाचित शक्य होणार नाही हेही धड मोजणे
प्रत्येकाचा वेगवेगळा खेळ असतो
अद्र्श्याच्या हातात , आपण नुसते बाहुले असतो
पाणी बदलतं , कावडीही बदलतात
पण धूळ खात पडलेल्या , प्रत्येकाच्या चोपड्या
जशाच्या तशाच राहतात ,
तुझ्या खेळाने , ब्रह्मदेवालाही भुरळू दे
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!
तुम्ही म्हणाल , पुरे झालं आटपा आता
पण कुणाच्या सांगण्याने
सोपं नसतं असं भराभरा आटोपून घेणं
आपण किती मैलाचे दगड चाललो
याचे पुस्तक सुद्धा ,
एकादी खूण ठेऊनंच मिटता येते
आमची अशीच खूण ,
तुला भरभरून फळू दे
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!
आम्ही सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव
कुठलीही गफलत खपणार नाही बघ
तू शंभराहून जास्त जग !
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!!!
-------------------------------------------------------
अरुण शिरढोणकर , ग्वाल्हेर , म. प्र.
------------------------------------------------------------------
मराठीचे वरिष्ठ साहित्यिक आणि माझे मोठे बंधू श्री अरुण शिरढोणकर यांनी सात वर्षांपूर्वी ही कविता माझ्यासाठी माझ्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात ऐकविली होती . या कवितेचे साहित्यिक मूल्यही फार जास्त आहे . आज फेसबुक वर मला मिळत असलेल्या साहित्यकारांच्या शुभेछांसाठी त्यांचाच सिंहाचा वाटा आहे . ते फेसबुक वर नसतात , म्हणून त्यांची रचना फेसबुक वर देऊन त्यांची ओळख करविणे मी माझे विनम्र कर्तव्य समजतो . आणि मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार .
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY