बरेच झाले माहेर
आता जाणे सासर !!
नसावी काहीच उणीव
पूर्णच करावा श्रुंगार
संसारी उबटण , मोहाची मळवटी
स्नान हे आत्मशुद्धीचे
शालू त्याच्या आवरणाचे
कुंकू कपाळभर
त्यानी दिलेल्या सौभाग्याचे
वेणी त्याच्या आठवणींची
सुगंध त्याच्या जाणिवेची
लाल हिरव्या बांगड्या
ओळख नक्षत्रांची
पैंजणांची रूनझुन
हसणे चांदण्यांचे
कधी भेट होई
प्राण आता कातर
आता जाणे सासर !!
नथेवर काळजीचा भार
बोचणाऱ्या बोलण्याने
कुडीसाठी केली धार
पळ काढावा , कोण जाणे
केव्हा बंद होई माहेरचे द्वार
आता जाणे सासर !!
शेवटच्या क्षणी कसला निरोप ?
संबंधांची ओटी ,भावनांचा अहेर
सर्वांची आहे एकच वाट
का होती डोळे कातर
आता जाणे सासर !!
-----------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY