Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

चहा की दुध

 

 

// मराठी व्यंग कथा ///
लेखक विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर . मं . प्र .
-----------------

- -श्रीकृष्ण रागाने येरझाऱ्या घालत होते .
--थोड्यावेळा पूर्वीच सुदामाने आणलेले पोहे रुक्मिणीने त्यांना दुधात भिजवून दिले होते . अमुलचे दुध व अमूल दुधाचे डब्बा बंद पदार्थ खाऊन खाऊन एव्हाना श्रीकृष्ण विसरलेच होते की मुळात दुध हा प्रकार गायी देतात . पण याक्षणी दुधपोहे खात खात त्यांना दुधाची गोडी जास्त जाणवत होती . त्यांना स्वत:ला आश्चर्य वाटलं की दुधात इतकी जास्त गोडी असते . पण मग रुक्मिणीनीच त्यांना सांगितलं की अमूलच्या दुधात चांगले चार मोठे चमचे साखर मिसळून त्यांना पोहे दिलेले आहे . आणि आता तयार झालेल्या पदार्थाचे नाव ,दुधसाखरपोहे असं आहे .
-- दुधसाखरपोहे नावाचा पदार्थ श्रीकृष्णाला खूप आवडला . मनातल्या मनात त्यांनी सुदामाचे आभार मानले , " सुदामा , मित्रा वहिनींनी इतक्या प्रेमाने माझ्या साठी पोहे पाठविले त्यामुळे मला दुधसाखरपोहे या नव्या पदार्थाची ओळख झाली . त्यांचे व तुझे मानावे तितके आभार . उद्यापासूनच मी दुधसाखरपोहे नावाच्या पदार्थाला राष्ट्रीय खाद्यपदार्थ जाहीर करण्यासाठी सांगतो .
-- दुधसाखरपोहे खातखात श्रीकृष्ण गोकुळातल्या आठवणीत रमले . ते माठ फोडणे , बऱ्याच वेळा सरळ गायींच्या थनातूनंच निघालेलं ताजं ताजं दुध पिणं , चोरून लोणी खाणं , वर यशोदेमातेशी खोटं बोलणं . सुदामा बरोबर सांदिपनी ऋषींच्या आश्रमातल्या केलेल्या गमती जमती आठवल्या , तर त्यांना गोकुळातल्या चाहड्याही आठवल्या . गवळणींबरोबर केलेल्या खोड्या ,यमुनेतले गोपिकांचे स्नान , ते त्यांचे झाडावर कपडे लपविणे , कपड्यांसाठी गोपिकांचा नदीतूनच केलेला आर्जव . . . . या सर्व आठवणीत श्रीकृष्ण रमलेले होते .
-- अशातच अचानक सेवकाने टीव्ही सुरु केला . टीव्हीवर बातम्या येत होत्या . आणि बस . . . . ती एक बातमी ऐकली व श्रीकृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकली . ताडकन उभे राहिले व रागाने येरझाऱ्या घालू लागले . चेहरा रागाने लाल झालेला होता . पण ते भगवंतच होते ना . तेच कर्ता आणि तेच करविता . किती म्हटलं तरी लाल चेहरा घेऊन काय होणार आणि काय करणार व आता इतक्या वर्षानंतर द्वारका सोडून कुठे जाणार ? चारी कडे जमिनीचे भाव वाढलेले , आता परवडण्यासारखे नव्हतेच . बरं ईश्वरासारखा काही चमत्कार करायचा म्हटलं तर शासनाने जादूटोण्यावर बंदी घातलेली . सुदर्शनचक्रासारख्या आग्नेय अस्त्राचा परवाना केव्हाच काल बाह्य झालेला आणि आता नवीन परवाना शासनाकडून मिळणं अशक्यच .
-- काही करायचं म्हटलंच तर समोर सुदामा बसलेला . कितीही झालं तरी उघडा नागडा सुदामा हा दळीद्रीच आहे , तो काय करू शकणार होता . श्रीकृष्णाला काही सुचेना काय करावे . लागले रागाने येरझाऱ्या घालायला .
-श्रीकृष्णाचे हे रूप पाहून सुदामा घाबरला . काही वेळ झोपाळ्यावर तसाच बसून राहिला . काही
वेळ शांतता पसरली . शेवटी सुदामानेच हिमंत केली , " काय झालं कृष्णा ? "
-" अरे हा कोण मोन्टेकसिह अहलुवालिया . . . . म्हणतो तरी काय . . . म्हणे, आता एप्रिल २०१४ पासून चहा हा या देशाचा ' राष्ट्रीय पेय ' होणार आहे ? म्हणजे काय ? गेल् हजारो वर्षांपासून मी ,मीच कशाला सर्वच दुधावर जगत आहे . सर्वात आवडतं पेय आहे सगळ्यांच . पण आता हे चहा ' राष्ट्रीयपेय ' होणार म्हणजे नक्की काय होणार ? "
-- " कृष्णा . . . " सुदामा म्हणाला , " अरे तू इकडे द्वारकेत रमला . सर्व दुधा तुपाचा
मारा आणंद सकट आजकाल याच प्रदेशात . आम्ही तिकडे गोकुळात . दुध नाही , की गायी नाही , की म्हशी पण नाही . अरे येवढंच काय ज्या शेळीचं दुध पिऊन गांधीजी पीत होते ती साधी शेळी सुद्धा हल्ली बघायला मिळत नाही . यमुनाही कोरडी पडली रे श्यामसुंदरा ! गोकुळातल्या लोकांचे दुध पिणं केव्हांच सुटलेलं आहे . "
-- हे ऐकून श्रीकृष्णाला धक्काच बसला , " मग आजकाल गोकुळातले माणसं काय पितात ?"
-- " जे गरिबीरेषेच्या खालती आहे ते काहीच पीत नाही , जे गरिबीरेषेवर बसले आहे ते कधी कधी चहा पितात , जे गरिबीरेषेच्या वरती आहे ते नेहमी चहा पितात , आणि जे गरिबीरेषेच्या खूपच वर आहे ते काहीही पितात आणि काहीही पाजतात . "
-- " म्हणजे नक्की काय पितात आणि काय पाजतात ? "
-- " जे गरिबीरेषेच्या खूपच वर गेलेले आहेत ते काहीही पितात . म्हणजे , कोका कोला पितात , पेप्सी पितात , ज्यांना कतरिना आवडते ते स्लाईस पितात , काही लोकं आणखीन वर जाऊन , बियर , देशी विदेशी मद्यपेय तर काही लोकं भांग ,अफीम ,गांजा ,चरस वगैरे पण
पितात . "
-- श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं . सुदामा काही भलतंच सांगत होता . गोकुळात गायी नाही ,? गेल्या कुठे सगळ्या ? आणि जनावरं पण नाही ? पण यमुनाही कोरडी पडली हे ऐकून श्रीकृष्ण जास्तच हळवे झाले .
-- " म्हणजे आता गोपिकां यमुनेत स्नान करत नाही ? "
-- आता सुदामाला आश्चर्य वाटलं , " अरे हल्ली गोपिका आहेत कुठे ? आणि स्नानाचं म्हणशील तर हल्ली अतिप्रदुषणामुळे कोणत्याही नदीत कोणीच स्नान करत नाही . "
-- " अरे . . . अरे " गोकुळात एवढी वाईट परिस्थिती यावी हा विचार करून श्रीकृष्णाला सारखं वाईट वाटत होतं . बरीच परिस्थिती बदलली होती म्हणायची गोकुळात .
-- " आता ही गरिबीरेषा म्हणजे काय भानगड आहे ? " श्रीकृष्णाने एकएक करतं गोकुळाच्या हालचाली विचारायला सुरुवात केली .
-- " कर्मदळीद्री लोकांची शासनाने बनविलेली यादी . तिला आम्ही ' गरिबीरेषा ' म्हणतो . तिचे मापदंड सतत बदलत असतात . "
-- " असं कसं " भगवंताला मनमोहनसिंगांच गणित समजण्याचा प्रश्नच नव्हता .
-- " मी सांगतो . तुला कुठे ठाऊक असेल ? आपल्या काळात कागदीमुद्रा कुठे होती . जशी लक्षमणाने सीतेसाठी ' लक्षमणरेषा ' खेचली होती तशी हल्ली शासनाने एक रेषा बनविली आहे . पोट भरो किंवा न भरो पण ज्या कुटुंबाचे सरकारने ठरविलेले रोजचे एक ठराविक उत्पन्न असेल , त्याला गरीब असे मानले जाते . तो गरिबीरेषेवर आहे असे मानले जाते . हा आंकडा सतत बदलत असतो . "
- " कमाल आहे गरिबीरेषेने दारिद्र्य कसं काय दूर होऊ शकतं ? तुझं झालं का ? "
- " मी तर गरिबीरेषेच्या तळात आहे . काय सांगू मित्रा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना मत देऊन झाले पण काही बदल झालाच नाही एकूण परीस्थिती कंसाच्या वेळे सारखीच आहे .
- " पण सुदामा ही चहाची काय भानगड आहे ? आणि चहा हा राष्ट्रीय पेय आहे म्हणजे नक्की काय ? मुळात चहा म्हणजे कोणता पेय ? " श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगितलेले सर्व उपदेश आठवू लागले , पण त्यातही कुठे ' चहा ' किंवा ' राष्ट्रीयपेय ' असे शब्द आलेले त्यांना आठवलं नाही
-" सांगतो . " सुदामा सांगू लागला , " अगोदर शांत हो . येरझाऱ्या घालणं बंद कर . तुझ्या येरझाऱ्या घालण्याने काहीच होणार नाही . गोकुळ न वृंदावन , मथुरा असो की द्वारका , या सर्वानीच आता बहुमतांनी दिल्लीश्वर निवडलेले आहेत व सत्तेचे व राजकारणाचं स्थान आता तेच आहेत . म्हणून दिल्लीश्वर ठरवतील तीच पूर्व दिशा . चहा दुधाचं काय घेऊन बसला , हल्ली मद्य म्हणजे सोमरसाला किती महत्व आहे हे ठाऊक आहे का तुला ? उद्या त्यांनी ' मद्याला '
राष्ट्रीयपेय जाहीर करण्याचे ठरविले तर , स्वर्गाचा ' सोमरसावर ' किती ही पेटेंट असला तरी इंद्र सुद्धा त्यांना अडवू शकणार नाही . एकाद्या देशाला जेव्हा चार पैसे मिळतात . . . .ते राष्ट्रीय असतं . राष्ट्रीय उत्पन्नाचे मह्तवपूर्ण स्त्रोत असल्याने मद्याच्या विक्रीसाठी गल्लोगल्ली परवाने दिलेले आहेत . "
- " आता गोंधळात टाकू नको . आत्ता चहा राष्ट्रीय पेय म्हणत होता , मग आता मद्याचं काय घेऊन बसला ? आणि दुधाचं काय ? दुधा सारखा एकदा इतर उत्तम पदार्थ असूचं शकत नाही . मग हे कोकाकोला , पेप्सी , चहा , सोमरस हे काय काय घेऊन बसला ? "
-" हे बघ , हॉकी हा या देशाचा राष्ट्रीय खेळ , पण सर्व क्रिकेट चं खेळतात . हिंदी ही राष्ट्रीय भाषा . पण पहिला मान इंग्रजीचा . मोर हा राष्ट्रीय पक्षी पण आजकाल लांडगेचं जास्त दिसतात . जेव्हा पासून व्हाघोबा हे राष्ट्रीय पशु झालेले आहेत त्यांची संख्या फारच कमी झालेल्या आहेत . एकूण असं गणित आहेत . काही असतं आणि काही दाखवावं लागतं . आजकाल म्हणे ग्लिसरीन लावलं की पावलो पावली खोटं रडतानाही दाखविता येतं . आपल्या वेळेस नव्हत बरं असलं काही . आणि बरं का कृष्णा , आता मोर पिसं लावण बंद कर , एकाद दिवशी कुणी पकडून नेईल . "
- " मी काय केलं ? "
- " अरे मोर हा राष्ट्रीय पक्षी , त्याचे पंख कुठून आणले याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल . "
- " अरे हे मोर पिसं काही नकली नाहीत . "
- " नकली असतील तर आणखीन धोका . नकली वस्तू वापरण्यासाठी गुन्हा दाखल होऊ शकतो ."
- कमाल आहे ,असली साठी पण गुन्हा व नकली साठी पण गुन्हा ? पण तू चहा बद्धल सांगत होता . हे मधेच काय घेऊन बसला ? " कृष्णाने विचारले .
-" सांगतो . " सुदामा सांगू लागला , " सुमारे दोनशे वर्षांपूर्वी आसाम या प्रदेशाच्या जंगलात आदिवासी एका विशिष्ट झाडाची पानं उकळून त्याचा रस पीत असे . यालाच पुढे इंग्रजांनी
" चहा " चे नाव दिले व त्याचा प्रचार प्रसार केला . आता चहा हा प्रकार सर्व जगात पसरला आहे व दुधाशीच याची प्रतिस्पर्धा आहे . चहात , दुध , साखर , लिंबू , मीठ वगैरे मिसळून किंवा काहीच न घालता पिता येतो . चहा हा सर्वांचा प्रिय पेय ठरलेला आहे , विशेष करून गोरगरिबांचा . "
- कृष्णाची अस्वस्थता दूर होत नव्हती . लहानपणापासून दुध , तूप , दही , लोणी खूप खाल्ल्या मुळे श्रीकृष्णाची शारीरिक व मानसिक शक्ती शाबूत होती . शरीराचे अवयव क्षीण झालेले नव्हते
तर मेंदूही सुन्न झालेला नव्हता . पण सुदामाचा नुसताच सापळा उरलेला होता व कोणत्याही क्षणी तो देखील चूर - चूर होऊ पाहात होता . त्या अगोदर श्रीकृष्णाला गोकुळातले सर्व वृतांत
माहित करून घेणे गरजेचे होते . शिवाय दुधाबद्धल श्रीकृष्णाची आपुलकी जगजाहीर होतीच . दुधा मुळेच श्रीकृष्णाने कंसाला आव्हान दिले होते . मथुरेच्या बाजारात गोकुळातले दुध , तूप , लोणी विकले जावो व गोकुळाचे खरोखर गोकुळ होवो हीच धडपड होती श्रीकृष्णाची .
- " पण हे सांग , राष्ट्रीय असणं म्हणजे काय ? चहा कसा काय राष्ट्रीयपेय असू शकतो ? आणि एकादे राष्ट्रीय पेय असेल तर ते चक्क प्यायचे ? आणि चहा राष्ट्रीय पेय झाला तर गायीं म्हशींच काय होणार ? "
- " माधवा , भारत नावाच्या आजच्या देशात राष्ट्रीय असण्यापेक्षा राष्ट्रीय दिसणं महत्वाचं .
शुध्द मनापासून राष्ट्र प्रेम नसून ही लोक राष्ट्रीयतेचे पागोटे मिरविण्यात आपली प्रतिष्ठा
समजतात . राष्ट्रीयता विकत घेता येत नसली तरी पागोटे गल्लो गल्ली विकत मिळते . म्हणून प्रत्येक गोष्टी मागे राष्ट्रीयता चिकटविणे या देशाचे मुख्य धोरणच बनलेले आहे . एकादा पक्ष , एकादा नेता , एकादा खेळाडू राष्ट्रीय झाला रे झाला की मग या सर्वांची जातच वेगळी होऊन बसते . कोणत्याही गोष्टीला राष्ट्रीय जाहीर केले की त्याला जोपासण्यासाठी योजना आल्या , तरतूद आणि मागोमाग भ्रष्टाचार ही आलाच . भ्रष्टाचाराचे मार्ग सोपे करण्याची सगळी साधनं . "
- श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा लाल रंग आता हळू हळू कमी झाला होता . सुदामाला समाधान वाटलं . पण भगवंताचा राग जरी कमी झाला असला तरी त्यांना बरेच प्रश्न पडले होते . त्यांच समाधान होत नव्हतं म्हणून ते अस्वस्थ होते .
- " अरे मी काय विचारतोय आणि तू कुठे कुठे भटकतोय ? दुधाचं सांग . गावों गावीं सर्व आर्थिक व्यवहार दुधाशी निगडीत आहे . मग या भारत देशात दुध का महत्वाचे असू नये ? आता बघ , तू काय म्हणतो तो चहा राष्ट्रीय पेय होणार आहे . चहा बद्धल मला काहीच विशेष माहित नाही . मला तर दुधाचे प्रकार माहित आहे . दुधाचा वापर म्हणजे पिण्यासाठी तर होतोच , त्याच दही पण जमविता येतं , ताक होतं , लोणी होतं , तूप बनतं , खवा होतो , खव्या पासून वेगवेगळी मिष्ठान्न बनतात . आणि तूच सांगितल्या प्रमाणे आजकालच्या काळात म्हणे दुधापासून
आईसक्रीम बनते , पनीर व चीस बनते . दुधाचे पावडर बनते , ते म्हणे परदेशात विकले जाते . आणि बरं का दुध नासलच तर त्याचाही वापर होतो . शिवाय हे सर्व पदार्थ पौष्टिक पण आहेत . चहा मध्ये आहेत का एवढे गुण ? "
- " नाही चहा मध्ये फक्त टोस्ट , ब्रेड व बिस्किट बुडवून खाता येतात . आणि गमंत अशी
की चहामध्ये दुध मिळविलेच जाते . "
- " तरी ही दुधाला ते महत्व नाही ? "
- " चहाचं राजकारण आणखीन काय ? "
- " म्हणजे . "
- " हल्ली चहा हा या देशात राजकारणाचा आणि भावनेचा मुद्दा झालेला आहे . "
-" नक्की काय म्हणायचं आहे तुला . "
-" सर्वेश्वरा , एवढ महाभारत घडविल , इतकं तत्वज्ञान जगाला दिलं , इतके राजकारणाचे आणि नितीमत्ताचे धडे पांडवांना शिकविले . चहाचे राजकारण मी तुला सांगावे म्हणजे काय ?"
-" आमचा काळ वेगळा होता बाबा . आमच्या वेळेस आजच्या सारखं मतांचं राजकारण नव्हतं ."
- " तेच . आता कसं ओळखलं . . इथं मतांसाठी चहाचं व दुधाचं राजकारण आहे . "
- आता श्रीकृष्णाला दुधाबद्दल जास्तच पुळका येत होता . नक्की काय भानगड आहे हे श्रीकृष्णाला अजूनही कळात नव्हत . श्रीकृष्णाने सुदामाला विचारले , " मला सांग गायीच्या थनातून चहा येऊ शकतो का ? गाय दुध तर देतेच पण तिच्या मुळे शेतीसाठी व इतर उपयोगासाठी बैल पण मिळतात . असला काही प्रकार चहा बरोबर आहे काय ? गुरंढोरांचे शेण सुद्धा कामात येतं . मला सांग चहा पासून दही , लोणी , ताक , तूप , खवा , व त्यात्यापासून मिष्ठान , आईसक्रीम वगैरे बनविता येते का ? महत्वपूर्ण म्हणजे मुलाला पहिल्या दिवसापासून आई मायेनं जे पाजते ते दुधचं न . मग पहिल्यादिवसा पासून चहा पाजला तर ? निसर्गाने जी अमुल्य भेट माणसाला दिलेली आहे ते दुध राष्ट्रीय पेय का असू नये . . त्याच्या बद्धल माणसाच्या व राष्ट्राच्या भावना का जुळू नये . माझा निरोप सांग त्या दिल्लीश्वरांना म्हणा विना कारण चहाबद्धाल देशाची अस्मिता जोडू नये . "
- सुदामा गप्पच बसला . त्याची काय बिशाद दिल्लीश्वरांसमोर ब्र सुद्धा काढायची . ----

 


---------------------
समाप्त //// लेखक :- विश्वनाथ शिरढोणकर , इंदर , म. प्र .

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ