लेखक :- विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर म. प्र.
--------------------------
-" गलगले . . . गलगले , उठा गलगले . बायको केव्हापासून ओरडतेय उठा म्हणून
. . . . तुमची ;सकाळ झाली ."
-" सकाळी सकाळी कसली कटकट गलगले ."
-" गलगले . . . गलगले , उठा ८. २० ची लोकल निघून जाईल . हल्ली पाण्याची
टंचाई असल्यामुळे , मुंबईत पाणी कपात आहे . त्यामुळे बादली भर पाणी ओतून
बायको तुम्हाला झोपेतून जागे करू शकणार नाही . म्हणून म्हणतो उठा . "
-" गप्प बसा हो . झोपू द्या मला गलगले ."
-" गलगले . . . गलगले बायको आली . तिनं तुमची चादर ओढली . आता ती
तुम्हाला उठवून बसविणार . तिच्या एका हातात केरसुणी आहे . म्हणून म्हणतो
वेळीच उठा . उठून बसला गलगले . शाब्बास . आता उभे राहा . झोपेत चालू
नका . बायकोच्या अंगावर आदळालं . नेमकं तेच तुम्हाला नकोय .
-" बायको कसली . . . सकाळी सकाळी छळच म्हणाना . आता जी छळायला सुरवात
करेल ती रात्रीपर्यंत छळतच राहणार . रोज माझा छळ मांडलाय हो गलगले ."
-" गलगले . . . . गलगले , असं म्हणू नका . ती बायको आहे तुमची . तुमच्या
पोरांची आई . बरं , अगोदर ब्रश करा बघू . बायकोने चहा तयार करून ठेवला
आहे . नंतर पटकन शहाण्या मुला सारखे तयार व्हा ."
-" होय . . होय , चहा ढोसतो . चहा कसला ? अमुलने दुधाचे भाव वाढविले .
साखरही माझ्यासारखी चाळीशी गाठते आहे . चहा तर आहेच महाग ! एवढे पैसे
कुठून आणायचे ? तुम्हाला सांगतो गलगले , आता तर विना साखरेचा काळा चहाच
देऊ लागली आहे ही काळी म्हैस ."
-" गलगले . . . गलगले , अहो बायकोला काळी म्हैस म्हणू नका . तुम्हाला
कोणी काळा बैल म्हटलं तर चालेल का ? "
-" म्हणा . खुशाल म्हणा . मला बैल कसलं म्हणता , चक्क गाढवंच म्हणा मला .
अण्णा सारखे म्हणायचे , ' आमच्या घरात् की नाही एक गाढव जन्माला आला आहे.
' मला सुरवातीला सारख वाटायचं की तो मी नव्हेच ! पण तुम्हाला काय
सांगू गलगले , आजकाल मला सारखं वाटतं . . . मीच तो. . . मीच तो गाढव .
अण्णांनी जेमतेम बारावी पर्यंत शिकू दिलं व सरळ वर निघून गेले . एका
मराठी माणसाला शिकूच दिलं नाही अण्णांनी . वरून कर्जाचं डोंगर माझ्या
डोक्यावर ठेवून गेलेत ."
-" गलगले . . . गलगले , अहो सकाळी सकाळी कशाला काढता कर्जाचा विषय . ?
बायको काढेलच की रोजच्या सारखा,निघताना ."
-" दगडं . तिला काय कळतं गलगले . तिला फक्त खर्च करणं माहित आहे .
तिला कर्जाचा ' क ' सुद्धा कळत नाही आणि त्याचा मन:स्तापही कळत नाही . "
-" गलगले . . . गलगले , तेच ते . अहो कर्ज ही तुमची डोकेदुखी आहे ,
बायको पोरांची नाही ."
-" बरोबर आहे . पण गलगले , अण्णांना नाही समजलं हे . ते तर माझ्या
डोक्यावर कर्ज सोडून गेले न . "
-" गलगले . . . गलगले , लवकर स्नान आटोपा आणि धावा . नुसता वेळ घालवू
नका नाहीतर ८. २० ची लोकल चुकायची आणि मग पुन्हा त्रास व कारखान्यात
पुन्हा फुली लागेल . "
-" गलगले निघाले स्नानाला "
-" गलगले . . . गलगले . . शाब्बास गलगले ! स्नान झालं . आता बायको काय
म्हणते ते ऐका . तिनं टिफिन तयार केललं आहे , ते ती हातात द्यायला येत
आहे . जर सांभाळून . तिच्याकडे पाहू नका , नाहीतर उगीच हसेल व काहीतरी
आणायला सांगेल . महिन्याचा शेवटचा दिवस , तुमच्या खिशात फक्त शंभरच रुपये
आहेत ."
-" आलं लक्षात गलगले . हा गलगले बायकोकडे पाहणारच नाही ."
-" गलगले . . . गलगले , टिफिन घ्या हातात . धावा . . "
-" धावलो गलगले ."
-" गलगले . . गलगले , धावण्यात आणि पळ काढण्यात तुम्ही पटाईत आहात . आतला
गलगले बाहेरच्या गलगलेला चांगलाच ओळखतो . "
-" धावून धावून धापायला झालं . शेवटी ४२१ मिळाली गलगले . केवढी रांग . .
. केवढी धक्काबुक्की ? गलगले , तुम्हाला सांगतो , हल्ली मुंबईत नं लोक
चालतात कमी , रांगेत जास्त लागतात आणि रांगेत लागल्यानंतर धक्काबुक्कीच
जास्त करतात ."
-" गलगले . . . गलगले , मराठी माणसानं रांगेतही व धक्काबुक्कीतही सर्वात
पुढे असायला हवं . तो त्याचा जन्मसिध्द अधिकारच आहे . कोणीही यावं व
मराठी माणसाच्या रांगेत शिरावं म्हणजे काय ? त्याचा धक्काबुक्कीचा अधिकार
हिसकावून घ्यावा म्हणजे काय ?
मराठी माणूस केव्हा जागा होणार ?"
-" शांत व्हा गलगले . . .शान्त व्हा .मराठी माणसाचा कैवार घेणार्यांना
कळलं तर ते मराठी माणसासाठी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या रांगेची मागणी करतील
. म्हणजे मराठी माणूस चेंगरणारच नाही . किंवा इतर काही मराठी माणसाचे
कैवारी मराठी माणसाला मुळात
रांगेचीच गरज नाही , अशी मागणी करतील . "
-" गलगले . . . गलगले, तुम्ही विसरताय. ' गलगले निघाले ' या
चित्रपटासाठी तुम्ही पाच तास रांगेत उभे होता . धक्काबुक्की,
चेंगराचेंगरी, गोंधळ हा सर्व प्रकारही होताच ."
-" नाव नको त्या सिनेमाचं . माझ्या नावावर सिनेमा बनविला , पण
माझ्यापेक्षा सर्व उलटंच दाखवलं . कुठे तो गलगले , कुठे हा गलगले ?
निर्माता - दिग्दर्शक एकदा भेटूच दे , विचारतोच त्यानां . "
-" गलगले . . . गलगले , नक्कीच विचारा . पण आता लवकर उतरा , स्टेशन आलं .
८. २० ची लोकल सुटेल , धावा . . धावा ."
-" उतरलो गलगले . मराठी माणसांन सावकाश उतरायचं असतं . पण गलगले , मराठी
माणसासाठी लोकलमध्ये वेगळा डबा असता तर किती बरं झालं असतं . म्हणजे
मराठी माणसाचं गुदमरणं थोडं कमी झालं असतं . "
-" गलगले . . . गलगले , शेवटी ८. २० ची लोकल तुम्हाला मिळाली . छान झालं
. खिडकीजवळ जागाही मिळाली ."
-" काय करणार गलगले , खिडकीचंच समाधान . स्वत:चं घर नाही . अण्णांनी ८०
वर्षांपूर्वी या चाळीत भाड्याने खोली घेतली होती , त्यात खिडकी नव्हतीच .
आता ती चाळ पण पडायला झाली आहे . आमची खोली विना खिडकीची , म्हणून
लोकलच्या खिडकीचंच मोकळं वारं व तेवढंच खिडकीचं समाधान . "
-" गलगले . . . गलगले , कौतुक करायला हवं हो तुमचं . अण्णांनी एका खोलीत
संसार केला , त्याच खोलीत तुम्हीही संसार थाटला . जी. . . जी. . . .
जी. . अण्णांना उतरत्या वयात नवसाने झालेले मूल म्हणजे तुम्हीच . .
गोपाळ गोविंद गलगले . आता गाडी चालू झाली बरं का . अहो लोकल फास्ट आहे .
नाही तर एक तुमच आयुष्य . प्रत्येक ठिकाणी
अडखळंत . मुंग्यांनाही लाजवेल अशा पावलांनी थांबत थांबत पुढे सरकतंय ."
-" काय करणार हो गलगले , नशीबच खोटं आपलं . चित्रपटातल्या गलगल्यांच नशीब
किती चांगलं म्हणायचं . नाहीतर आम्ही एक दळीद्री गलगले . वास्तवातले
अपयशी गलगले ."
-" गलगले . . . गलगले , त्यांना कसं काय हो जमलं तुमच्यावर एवढा चांगला
चित्रपट बनविणं ? त्या चित्रपटातली तुमची बायको किती सुंदर देखणी होती
जणू स्वर्गातली अप्सरा !"
-" अहो गलगले , चित्रपटातली नटी आहे ती , म्हणूनच अप्सरेसारखी एवढी सुंदर
आहे . नाहीतर वास्तविक आयुष्यातली आमची म्हैस . गाणं गाता येत नाही की
नाचता येत नाही ."
-" गलगले . . . गलगले , चित्रपटातली तुमची बायको वास्तविक आयुष्यातही
तुमची बायको झाली असती तर सर्व मज्जाच मज्जा होती . तुम्ही श्रीमंत झाला
असता . तुमचं सासर श्रीमंत आणि तुम्ही घरजावई . राहायला बंगला , फिरायला
गाडी , सोबतीला अप्सरा ! तुम्हीतर पैशातच लोळला असता हो ."
-" काय सांगू गलगले , तुम्हाला तर माहीतच आहे , कसं लग्न झालं आमचं .
काहीच मिळालं नाही हो हुंड्यात . अण्णा म्हणाले होते , ' माझ्या बाल
मित्राची पोर आहे . तिच्या जन्मापासून मी तिला सून मानली आहे व तसा शब्द
पण दिला आहे . ' मग काय ? करावं लागलं लग्न . वेगळं राहण्याची सोय नव्हती
, मग अण्णांचं ऐकणं भागच होतं ."
-" गलगले . . . गलगले , अण्णांनी फार गोंधळ केला हो तुमच्या आयुष्यात .
धड शिकू दिलं नाही , तुमच्या आवडीच्या मुलीशी लग्न होवू दिलं नाही .
चांगला हुंडाही घेऊ दिला नाही , वर कर्ज देऊन गेले . "
-" काय सांगू गलगले , आयुष्य हे चित्रपटासारख काल्पनिक नसतं हो . "
-" गलगले . . ग़लगले , भायखळा गेलं . . दादर येतंय . कल्याण यायला अजून
बराच वेळ आहे , तोवर एकादी डुलकी घेऊन घ्या . घरात एवढ्याशा जागेत नीट
झोप होत नाही तुमची . रोज परतायला रात्रीचे दहा वाजतात . वरून सकाळी रोज
लवकर उठावं लागतं ."
-" नाही हो , झोप कसली म्हणता गलगले . उडाली हो माझी झोप कायमची . सारखी
सारखी चित्रपटातली माझी बायको डोळ्यासमोर येते . "
-" गलगले . . गलगले , तेच म्हणतो मी . झोप घेतली असती तर स्वप्नात
तिच्याशी बोलता आलं असतं . लोकलमधलं स्वप्न पटकन येतं आणि पटकन जातं ."
-" तुम्हाला नाही कळणार हो गलगले . अजून आईला भेटावयाचं होतं तिला ."
-" गलगले . . . गलगले , पण चित्रपटात तुम्ही मेलेल्या आईशी सतत काय बोलत
असता हो ? आणि कशासाठी . ?"
-" अहो गलगले , तो काही आईच्या मायेचा चित्रपट नव्हता आईला जिवंत दाखवायला .
तो आईच्या मायेसाठी भुकेला तिच्या पोराचा चित्रपट होता . पण काय सांगू
गलगले , अण्णांमुळे माझी आई लवकर गेली हो . अण्णा बेवडे , दारू पिऊन
रोज राडा घालायचे .
आईला मारहाण करायचे . अशातच आई आजारी झाली . अण्णांनी औषधपाणी नाही केलं
हो तिचं . गेली बिचारी . मला न अण्णांना सारखा जाब विचारावासा वाटतो .
अण्णा , तुम्ही
माझ्यासारख्या भाबड्या , साध्या सरळ मराठी माणसाची वाताहत केली हो
प्रत्येक बाबतीत . "
-" गलगले . . . गलगले , अण्णांना कशाला नावं ठेवता ? तुम्ही काय कमी दिवे
लावता आहात ? दहा वर्ष झाले बायको माहेरी गेलेली नाही . सहा महिने झाले
पोरांची शाळेची फी भरलेली नाही . चार महिने झाले वाण्याचे पैसे दिलेले
नाही . दोन वर्ष झाले पोरांना नवे कपडे नाही .बायको बाजारात जाणेच विसरली
. अण्णा बिचारे तर मिलमध्ये साधारण हेल्पर
होते . जसं जमलं तसं त्यांनी संसार रेटला . "
" मग मी का कोणता गवर्नर जनरल आहे का गलगले ? मी सुद्धा कल्याणला एका
कारखान्यात साधारण कारकुनच आहे ना ? माझे ही उत्पन्न फारसे काहीच नाही .
"
-" गलगले . . . गलगले , आजच्यानंतर आता तेही राहणार नाही . आज
कारखान्यातला तुमचा शेवटचा दिवस आहे न ? उद्यापासून तर तुमचा कारखाना
बंदच होणार आहे . मग आता काय करणार ? "
-" मोठा प्रश्न आहे गलगले . मी काय करणार ? येउन जाऊन मी मराठी माणूस !
दुसरी नोकरी शोधेन ."
-" गलगले . . ग़लगले , शोधा. . . दुसरी एकादी नोकरी लवकर शोधा . पण तोवर
बायको पोरांना काय देणार ?"
-" मी काय देऊ शकतो गलगले ? जे मला वारसात मिळालं तेच मीही देऊन जाणार .
अण्णांनी दिलेली ढासळू पाहणाऱ्या चाळीतली अंधारच अंधार असलेली एकमेव ही
भाड्याची खोली मुलाला देऊन जाईन . त्याला अर्धवट शिक्षण देऊन जाईन .
अण्णांनी दिलेला कर्जाचा उरलेला डोंगर त्याच्या डोक्यावर ठेऊन जाईन .
बायकोला अर्धवट संसाराच सुख देऊन जाईन . रिकाम्या हातानी नाही जाणार
गलगले ."
-" गलगले . . . गलगले , तुम्ही निवृत्तीची भाषा बोलता आहात ."
-" मग काय करणार गलगले ? कारखान्याला मालकांनी कुलूप ठोकले . आता होती
नव्हती तेव्हढी जमलेली रक्कम घेण्यासाठी पायपीट करावी लागणार . अशात मी
कोणाला काय देऊ शकतो ."
-" गलगले . . . गलगले , शांत व्हा . काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल .
चित्रपटातही शेवटी मार्ग सापडलाच होता . आठवतंय ? "
-" काय घेऊन बसलात गलगले . चित्रपटाच्या सुखद शेवटासारखं आयुष्याचा शेवट
तर सोडाच , मुळात आयुष्यात सुखद असं काहीच नसतं . "
-" गलगले . . . गलगले , अहो कल्पनेत रमणं सुखद असतं . "
-" त्याने पोट नाही भरत हो गलगले . संसार नाही चालत . पोरांना कपडे नाही
करता येत . त्यांची फी नाही भरता येत . बायकोच्या आवडी पूर्ण नाही करता
येत . त्या मुळे संसाराचा नुसता चुराडाच होतो . नुसत्या कल्पनांनी काय
होतं . आणि तुम्ही ही माझ्या कल्पनेत नका येत जाऊ . माझ्याशी सवांद नका
साधत जाऊ . नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात . काय उपयोग हो तुमचा ? "
-" गलगले . . . गलगले , अहो मन मोकळं होतं स्वत:शीच बोलण्याने . मेंदूचा
व्यायाम होतो . स्मरणशक्ती शाबूत राहते . आयुष्यात पैसाच सर्व काही नसतं
. ज्याला त्याला आपल्या
ऐपती प्रमाणे मिळतं . पण स्वत:शीच बोलण्याने जगण्याचे बळ येतं . बरं . .
. चला तुमचा कारखाना आला . आता कामा मुळे तुम्हाला वेळ मिळणार नाही .
संध्याकाळी परतताना
भेटू . "////// समाप्त ///////
विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर म. प्र . -- मो . ९१९८९३१२५२४७
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही कथा इंदूरहून प्रकाशित " मी मराठी " साप्ताहिकाच्या १२ जून २०१० च्या
अंकात प्रसिध्द झाली . नंतर " व्यवस्थेचा ईश्वर " या माझ्या कथा संग्रहात
प्रसिध्द झाली . कथा संग्रहाचे
प्रकाशक , ' मधुश्री प्रकाशन ' पुणे हे असून हा कथा संग्रह , बुकगंगा
डाट काम ' वर उपलब्ध आहे .
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूरहून प्रकाशित , " साहित्य सहयोग " च्या दीपावली २०१३ च्या
अंकात प्रसिध्द झालेली माझी कथा , " हसायचं नाही " समूह च्या सदस्यांसाठी
येथे देत आहे .
-------------------------------------
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY