लेखक :-
विश्वना शिरढोणकर
--------------------------
*********************************************************
लहानपणी वाचलेली आटपाट
नगरातल्या एका राजाची गोष्ट आठवते . राजाला चापलूस व खुशामद खूप आवडायची
. स्वताच्या स्तुतीने राजा अगदी भारावून जायचा . म्हणून राजाला नेहमीच
खुशामदी व चापलूस दरबारी घेरून असायचे . एकदा चापलूसांनी कळस गाठला .
राजाची खोटी प्रशंसा करून व त्याला भ्रमित करून त्याला अति पारदर्शी अशा
बारीक मलमली पोषाखात हत्तीवर बसवून नगर भ्रमणासाठी तयार केले . राजाची
स्वारी नगरातल्या प्रमुख मार्ग आणि बाजारपेठेतून निघत होती . सर्व प्रजा
आपल्या राजाला हत्तीवर जवळ जवळ नागड्या अवस्थेत बसलेला बघून हैराण झाली
. प्रजेला राजाची हि अवस्था बघून फारच वाईट वाटले . पण क्रूर ,
अत्याचारी आणि निर्लज्ज राजाला त्याची खरी अवस्था सांगण्याची हिम्मत
कोणामध्येच नव्हती . तेवढ्यात अचानक एक लहानसा चिमुरडा जोराने ओरडला ,
" राजा नागडा राजा नागडा ."
लहानपणी वाचलेली ती कथा इतकीच होती . पणआजच्या काळात
आणि आजच्या परिस्थितीत ही कथा या प्रमाणे पुढे वाढू शकते . ती म्हणजे
अशी की " राजा नागडा राजा नागडा " ओरडत तो लहान मुलगा आनंदाने नाचत होता
, टाळ्या वाजवीत होता त्याचा आनंद गगनात मावत नव्हता . त्याने राजालाच
काय पण कधी कोणाला नागडं बघितलेलं नव्हतं . त्याच्या बालमनात राजा म्हणजे
ईश्वराचा अवतार असं भरविल गेलं होतं . म्हणूनच राजालाही नागडं पाहता आलं
हा या क्षणाचा फार मोठा आनंद आहे असं त्या लहान चिमुरड्याला वाटतं होतं
. राजाला नागडं पाहणं त्याला अभिमानस्पदही वाटलं . पण या मुळे राजाला
अपमानास्पद तर वाटलंच पण त्याला पहिल्यांदाच बोधही झाला की त्याची प्रजा
त्याला नागडा पाहत आहे . आपल्या प्रजे समोर नेहमीच भरजरी दरबारी
पोशाखात राहणारा राजा ओशाळला . आणि संतापला . लहान मुलाचे धाडस पाहून
,त्याची स्पष्टोक्ती पाहून सर्व प्रजा त्या मुलाचे कौतुक करू लागली .
राजावर कोणत्याही प्रकारची टीकाटिप्पणी करण्याचे धाडस नसणाऱ्या
प्रजेच्या हृदयात आत्मविश्वास संचारला . आता जो तो जोरजोराने हंसू लागला
. जोरजोराने टाळ्या वाजवून लहान पोराच उत्साह वाढवू लागला . या राज्यात
काही क्षणांसाठी का असेना , प्रत्येकाला खुदकन हंसू आलं होतं . गेल्या
अनेक वर्षात या राज्यात कोणीही कोणालाही कधी हसताना बघितलेच नव्हते .
प्रत्येकाला असं वाटलं की क्षणभरासाठी ते
सर्व राजाच्या अत्याचारापासून मुक्त झालेले आहे . गारव्याची झुळूक
सर्वांच्या अंगाला स्पर्श करीत होती . क्षणभरासाठी सर्व त्या लहान पोरात
भविष्याचा राजा बघू लागले . म्हणून टाळ्यांच्या गजरात जास्त उत्साहात
जणू आनंदोस्तवच साजरा होऊ लागला . हे सर्व बघून राजा जास्तच चिडला .
त्याला वाटलं त्याची सर्व प्रजा त्याचा घोर अपमान करीत . त्याने विचार
केला प्रजा बेशिस्त झालेली आहे तिला तत्काळ वठणीवर आणण्याची गरज आहे .
त्याच क्ष राजा आपल्या महालात परत गेला . ज्यांनी त्याला अशा पोशाखात
मिरवणूक काण्याचा सल्ला दिला होता त्या सर्व सल्लागारांना राजाने गजाआड
केले व त्यांना कठोर क्षिक्षाही देण्याचा हुकुम बजाविला . नंतर त्याने
आपला दरबार भरविला .
दरबारात चर्चा सुरु झाली . राजासमोर फार
मोठा प्रश्न पडला होता की त्याच्या राज्यांत त्याच्या अत्याचारामुळे
नेहमीच दु:खीकष्टी राहणारी , सतत रडत राहणारी त्याच्या राज्यातली त्याची
प्रजा अचानक आनंदात व उल्लासात कशी काय असू शकते ? राजाचं कामंच प्रजेला
पावलोपावली रडविण्याचे आहे असे राजाचे ठाम मत होते . त्याचं असं ही मत
होतं की ज्या राज्यात प्रजा आनंदाने ,सुखाने गुण्यागोविंदाने नांदत असेल
, त्या राज्यात राजवट असूच शकत नाही . शिवाय सव प्रजेची मजल आज राजावरच
हसण्यापर्यंत गेली होती . आपण कुठ कमी पडतं आहो काय असा प्रश्न राजाला
पडला . प्रजेला आणखिनच जास्त दु:खीकष्टी करण्याचा राजा गंभीरतेने विचार
करू लागला . यावर काहीतरी तातडीने उपाय शोधणे गरजेचे आहे , राजाने असं
आपलं मत दरबारात बोलून दाखविले .
दरबारात चर्चेचा विषय फार गंभीर होता .
मूळ मुद्दा होता , राज्यात कधी कोणाला कोणी ह्संवू नये आणि कुणी कधी
हंसूही नये . यासाठी दरबारात गंभीर मंत्रणा होत होती .
उपाय योजना आखल्या जाऊ लागल्या . कायद्यात बदल करून हसण्यासाठी
वेगवेगळ्या प्रकारच्या कठोर क्षिक्षा करण्याचे दरबारी चढाओढीने सल्ले देत
होते .
कुणी एकाने आपले मत मांडले , " राजा हा
ईश्वराचा प्रतिनिधी असल्याने राजावर हसण्यास कायद्याने बंदी घालण्यात
यावी ." तर एका आणखीन चापलूसाने
राजाला जास्तच खुष करण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला , " राजन आपल्या
पंतप्रधानांना कोणीही कधी हसताना बघितलेलेच नाही . म्हणून
पंतप्रधानांचा सार्वजनिक सत्कार करायला
हवा . म्हणजे सर्वसामान्यांना कधी हंसू नये यासाठी प्रेरणा मिळेल ."
पण लगेच याचा विरोधही
झाला . कारण या सत्कारामुळे सर्वसामान्य आपसुखच हसतात हा सिद्धांत
आपोआपच खरा ठरण्याची भीती होती . म्हणून पंतप्रधानांचा सत्कार सोहळा
होता होता राहिला . या शिवाय या
सल्ल्यामध्ये हसण्यावर कायद्याने बंदी घालण्यासारखे काहीच नव्हते . एखादा
लहान मुलगा आपसुखच जेव्हा निखळ हसेल किंवा एखाद्याने हसण्याचे ठरविलेच तर
त्याला आळा कसा काय घालणार ? या बद्धल काहीच नव्हतं . म्हणजे राजाच्या
अपमानाचा मुद्दा राहिलाच होता त्याच काय ?
कोणा एकाला राजाची व्यथा समजली . तो
चापलुसीत थोडा जास्तच हुषार होता . त्याने राजाला सल्ला दिला , "
राजन , हंसणे म्हणजे ' राष्ट्रीय शरम ' जाहीर करण्याची गरज आहे . जेणे
करून हसण्याचा विचार मनात यायलाच नको . " त्याने पुढे आणखीनच महत्वाचा
सल्ला दिला . तो राजाला म्हणाला , " राजन , हसण्याचा विचार मनात
येण्याच्या अगोदरच माणसाने लाजिरवाणं व्हायला हवं . यासाठी
मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याची गरज आहे . लाजेने ,शरमेने जमिनीत कसे
धसावे यासाठी मोठ्या पातळीवर प्रत्येकाकडून प्रायोगिकी करविण्याची
गरज आहे . त्यासाठी पूर्ण राज्यात मोठ्या पातळीवर वर्ग भरविण्याची पण
गरज आहे . म्हणजे हसण्याच्या किंवा हसविण्याच्या अगोदर प्रत्येकाला
जमिनीत धसणं सहज सोपं होईल . हसल्यावर किंवा हसविल्यावर जमिनीत धसण्याचा
कायदा बनविण्याची गरज आहे म्हणजे यापुढे कोणी एखादा वासुदेव पण लहान
पोरांना हसवू शकणार नाही . माकडांचा व अस्वलांचा खेळ दाखवून दारोदारी
सर्वाना हसवित फिरणाऱ्या डोंम्बा-याला राज्यात प्रवेशावर बंदी घालण्याची
गरज आहे . याच प्रमाणे जोकर असेलत्या सर्कशीच्या प्रयोगावर सुद्धा
बंदी घालण्याची गरज आहे ."
एका दरबा-याने आपले अति महत्वाचे
विचार राजासमोर मांडले . तो राजाला म्हणाला , " राजन , हसण्याच्या इतर
साधनांवरसुद्धा बंदी घालण्याची गरज आहे . हसण्यासाठी प्रेरक असलेले
विनोद , व्यंग , व्यंगचित्र , कार्टून , विनोदी नाटक , विनोदी साहित्य ,
विनोदी चित्रपट , हास्य सम्राट , हंसा चकटफू , फू बाई फू व कामेडी
एक्सप्रेस सारख्या खळखळून हसविणाऱ्या विनोदी मालिका व हास्य कवी
सम्मेल्लन आणि असल्या कोणत्याही प्रकारच्या हास्य कार्यक्रमांवर राज्यात
लगेच बंदी घालण्याची गरज आहे . आपल्या कलेने विनोद निर्मिती करण्याऱ्या
सर्वच कलावंताना लगेच तुरुंगात टाकण्याची गरज आहे . इतकच काय तर बागेत
फुलांना सुद्धा हसण्याची संधी मिळता कामा नये . असं सर्व झालं तर
सर्वसामान्यांच्या हसण्यावर आपल्याला नक्कीच आळा घालता येईल ."
एका आणखीन चापलूस दरबा-याने राजाला
मोलाचा सल्ला दिला . तो म्हणाला , " राजन , हसणं बंद व्हावं या साठी
प्रजाजनांना पावलोपावली रडण्यासाठी बाध्य करण्याची गरज आहे . त्यासाठी
कार्य योजना आखायला हवी , म्हणजे शासनाने महागाई जास्त वाढवायला हवी .
महागाई जास्त वाढविण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाला कडक निर्देश
देण्याची गरज आहे . उदाहरणार्थ , पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढवायला हवे
आणि त्या प्रमाणेच रेल्वे व एसटीच्याही भाड्यात सतत दरवाढ होत असावी .
एवढेच काय तर या सर्वाना सरळ महागाई सूचकांकाशी जोडायला हवे . सूचकांक
आणी महागाई यात चढाओढीने स्पर्धा असायला हवी . सर्वसामान्यांवर प्रत्येक
गोष्टीसाठी फार जास्त दराने कर लावायला हवे . महागाई इतकी वाढवायला हवी
की कोणालाही घरातच काय , बेकेंतच काय पण खिशातसुद्धा पैसे ठेवता येऊ
नये . सर्व पोषाख विना खिशाच्या शिवल्या जावोत यासाठी कडक कायदा बनवायला
हवा . याहूनही महत्वाचे म्हणजे कोणालाही न्याय मिळता कामा नये याची चोख
व्यवस्था करायला हवी. शुल्लक कारणासाठी सुधा कडक क्षिक्षा व्हायला हवी .
असं झालं तर आपल्या राज्यात राजन ,
प्रत्येकजण नेहमी त्रस्त व दु:खी असेल व हसणं नेहमी करता विसरेल ."
एका सल्लागाराने आपला वेगळाच विचार
मांडला . तो म्हणाला " राजन , तान्हुल्याला आपसुखच हंसू येतं तर
मोठ्यांना हसण्यासाठी आपले दात दाखवावे लागतातं . दवंडी देऊन
,राज्यातल्या प्रत्येकाने आपले दात स्वत:होऊनच उखडून टाकावे अशी
जाहीर घोषणा करायला हवी . यासाठी सक्तीही करावी लागली तरी चालेल . पण
याने अनेक प्रश्न आपोआप सुटतील . सर्व प्रथम म्हणजे राज्यात कोणीही कधी
दात दाखवून हसू शकणार नाही .
शिवाय प्रत्येकाचे खायचे दात कोणते आणि दाखवायचे दात कोणते हे तपासण्यात
सरकारी यंत्रणेचा वेळ वाया जाणार नाही . तिसरं कोणाचीहि कधी दातखिळी
बसणार नाही . आणि चौथं आणि महत्वाचं म्हणजे राज्यांत कोणाचेही दातंच
नसतील तर त्यांना धड खाताही येणार नाही. आणि या प्रकारे राज्यातील अन्न
धान्याची टंचाई पण आपोआप मिटेल .
सर्व चापलूस दरबारी गंभीरतेने
राजाला वेगवेगळे सल्ले देत होते . आपले मोलाचे विचार मांडत होते . पण
राजाचे चित्त थाऱ्यावर नव्हते . एका लहान पोराने राजाचा इतका मोठा अपमान
करावा याला काय म्हणायचं ? तो लहान मुलगा सतत राजाच्या डोळ्यासमोर येत
होता , ज्याने ' राजा नागडा राजा नागडा ' ओरडत सर्वाना राजाच्या नागडा
होण्याची जाणीव करविली होती . आणि म्हणूनच सर्व प्रजा राजावर खुदकन हसली
होती . राजाला नागडं पाहण्याचे ते द्र्श्य प्रजा कशी काय विसरू शकेल ?
आणि खुद्द राजालाही हे विसरणं शक्य नव्हतं . राजा विचार करत होता कि
सर्वजण मनातल्या मनात तर हसतच असतील . मग कोणाला मनातल्या मनात हि
हसण्यापासून कस काय थांबविता येईल ? अन राजाच्या अपमानाचं काय ? या
राजाच्या झालेल्या अपमानासाठी आणि प्रजेने केलेल्या गुन्ह्या साठी
कोणत्या कायद्या प्रमाणे शिक्षा द्यायला हवी . काहीही झालं तरी
प्रजाजनांना पश्चात्तापहि व्हायलाच हवा . पण कसा ? हाच सर्व विचार करून
करून राजा फार अस्वस्थ होत होता .
शेवटी बऱ्याच गंभीर मन्त्रणेनंतर सर्वांच्या सल्ल्याने राजाने राज्यात
तत्काळ नवा ' हसणं प्रतिबंधात्मक कायदा ' लागू केला . हसणं हे '
राष्ट्रीय शरम ' असं जाहीर करण्यात आलं . हसणं हे कायद्याने गुन्हा
ठरविण्यात आलं . इतर उपाय योजनांमध्ये सर्व शालेय व महाविद्यालयीन
पाठ्यक्रमात बदल करून हसण्यासाठी प्रेरक ठरणारे सर्व हास्य व
विनोदाचे मनोरंजक धडे वगळण्याचे आदेश देण्यात आले . यामध्ये , अकबर
बीरबलचे विनोदच नव्हे तर मुल्ला नसुरुद्दिन आणि तेनालीरामसकट फार मोठ्या
प्रमाणात आधुनिक विनोदी साहित्यिकांचे साहित्य , व्यंगचित्र , व्यंग
नाटकं सर्व सर्वच वगळण्यात आले .येवढच काय तर द्रौपदी पांडवांवर हसली
होती हा प्रसंगही महाभारतातून वगळण्यात आला . विनोदी मालिका आणि विनोदी
चित्रपटांवर कायम बंदी घालण्यात आली .सर्कशीवर आणि मदारीवर राज्यात बंदी
घालण्यात आली . मालिका आणि चित्रपटांवर हसण्याचे द्रश्य दाखविण्यास बंदी
घालण्यात आली . हसणं हा शब्द लोकांच्या कधी आठवणीतहि राहू नये
म्हणून सर्व शब्दकोशातून व बाराखडीतून " ह " हे अक्षरच वगळण्यात आले
.
अशा प्रकारे आटपाट राज्यातल्या
राजाची प्रजाजनांद्वारे त्याच्यावर हसण्याची भीती कायमची संपली . राजा
सुखावला व आत्ममुग्ध झाला . आता त्याला त्याच्या अपमानाची भीतीच उरली
नव्हती . आता आपल्यावर कोणीही कधीच हसू शकणार नाही या विचाराने राजाने
सर्व लाजलज्जा सोडली व तो निर्लज्जपणे वावरू लागला . राजाला निर्लज्जपणे
वावरताना पाहून राजाच्या चापलुस दरबा-यांमध्ये जास्तच जास्त निर्लज्जता
प्रदर्शित करण्याची जणू चढाओढच सुरु झाली . समाप्त .***************
---------------------------------------------------------------------------------------------------
विश्वनाथ शिरढोणकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY