लेख -किती शिल्लक राष्ट्र प्रेम -किती उरली राष्ट्र भक्ती ?
-लेखक -विश्वनाथ शिरढोणकर ---------------------------------------------------------------
- हा लेख इंदूर (म.प्र. ) हून प्रकाशित " मी मराठी " साप्ताहिकाच्या दिनांक १४ ऑगस्ट -२०१० रोजीच्या अंकात प्रसिध्द झालेला आहे . नंतर हाचलेख , प्रियांजली प्रकाशन ,
पुणे तर्फे,मे २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या ललितलेखसंग्रह, " नेते पेरावे -नेते उगवावे ' या संग्रहात सामील आहे . स्वातंत्र्य दिनानिमित आज परत माझ्या सर्व मित्रांनी वाचवा म्हणून येथे देत आहे . आपला प्रतिसाद मला आवडेल , आपल्या विचारांचे स्वगतच असणार आहे . शुभेच्छा .
---------------------------------------------------------------------------------------------------------
-कोणत्याही राष्ट्राची भौगोलिक सीमा हे त्या राष्ट्राचे अस्तित्व , महत्व आणि ओळख टिकवून ठेवण्यासाठी पुरेशी नसते . या सीमारेषेच्या आत त्या राष्ट्रातल्या नागरिकांच्या राष्ट्राबद्दल
ज्या आपुलकीच्या प्रचंड प्रगल्भ भावना असतात , जे प्रेम , जो आदर , ज्या कर्तव्य भावना असतात व या सर्वांचे रुपांतरण नागरिकांच्या आचरणात व वागणुकीत जेव्हा प्रत्यक्षात आढळतात , यालाच आपण राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती म्हणू शकतो . राष्ट्राच्या स्थायित्वासाठी व सर्वांगीण विकासासाठी आणि भावनात्मक द्रष्ट्या राष्ट्राला एक सूत्रात बांधून ठेवण्यासाठी राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीची नितांत गरज असते .
-इतिहास साक्षी आहे की राष्ट्र प्रेमाच्या अभावी भारताची फाळणी झाली . पुढे पाकिस्तानच्या नागरिकांमध्येही राष्ट्रभक्तीचा ऱ्हास झाल्याने पाकिस्तानचे परत दोन राष्ट्र झाले . पाकिस्तानी जेवढे धर्माच्या बाबतीत कट्टर आणि असहिष्णू होते तेवढे राष्ट्रासाठी नसावेत म्हणून बांगलादेशची निर्मिती झाली . भारत - पाकिस्तान मध्ये दहशतवाद मुळात राष्ट्रभक्तीच्या भावनांमध्ये ऱ्हास झाल्यामुळेच आहे . सोवियतसंघातही राष्ट्रभक्तीच्या भावांना अभावी त्या राष्ट्राचे अनेक तुकडे झालेले जगाने बघितले . या उलट नागरिकांच्या अतोनात देशभक्ती आणि देशप्रेमाच्या दृढ भावनांमुळे जर्मनी आणि व्हियतनाम हे राष्ट्र म्हणून परत एकीकृत झाले .
-राष्ट्र प्रत्येक नागरिकाला सुरक्षे बरोबर , जगण्यासाठी अन्न , वस्त्र , निवाऱ्याची सोय करण्यासाठी साधनं उपलब्ध करवितो . नागरिकांना समाजात , त्यांच्या परिवारासकट त्यांना , विकसित होण्याची संधी उपलब्ध करवून देतो . विशेष म्हणजे राष्ट्र आपल्या नागरिकांना महत्वपूर्ण अशी ओळख देतो . म्हणून राष्ट्राचे महत्व सर्वोपरी असून ते वेगळ्याने पटविण्याची गरज नाही .
-आपल्या देशात राष्ट्रभक्तीची व राष्ट्रासाठी लोकांनी केलेल्या त्यागाची , बलिदानाची आणि त्यांनी केलेल्या संघर्षाची ,असंख्य उदाहरणं देता येतील . भगत सिंग , वीर सावरकर , महात्मा गांधी , लोकमान्य टिळक , बाबासाहेब आंबेडकर , ही गेल्या शंभर वर्षातील राष्ट्रभक्तांची काही नावं . थोडं मागे गेलो तर थोड्या संसाधानंने झाशीच्या राणीचे इंग्रजांना झुंज देऊन राष्ट्रासाठी स्वत:चे बलिदान देणे , किंवा छत्रीपती शिवाजी महाराजांची एका श्रेष्ठ राष्ट्र निर्माणासाठीची तळमळ आणि त्यासाठी केलेला कठोर संघर्ष . असले अनेक उदाहरण देता येतील .
-त्याग हे राष्ट्र भक्तीच्या भावनांनी ओतप्रोत असण्याचे सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे . राष्ट्राला त्याच्या नागरिकांकडून प्रचंड राष्ट्र प्रेमाची गरज असते . राष्ट्र आणि नागरिकांचा संबंध परस्पर निर्भरतेचा असतो .आपल्या नागरिकांना पिढ्या न पिढ्या सुरक्षिततेची शाश्वती देत असता राष्ट्र आपल्या नागरिकांकडून कर्तव्या बरोबरच राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची अपेक्षा बाळगतो . कोणत्याही नागरिकाने राष्ट्राच्या हिताविरुध्द काही करू नये हीच अपेक्षा राष्ट्राची असते . राष्ट्रभक्तीच्या भावांनामुळे कर्तव्यबोध जाग्रत होतो व या कर्तव्य बोधामुळे सामाजिक बांधिलकी पण वाढते .एकूण राष्ट्राच्या विकासाचा मार्ग प्रशस्त
होतो .
-स्वातंत्र्यानंतर भारतीयांच्या राष्ट्रप्रेमाची आणि राष्ट्रभक्तीची परीक्षा अनेक वेळा झालेली आहे . त्यात चीन , सकट पाकिस्तान बरोबर युध्द , आणि विशेष करून आपल्याकडे खूप मजबूत ठरलेली लोकशाही . पण हेही खरं आहे की गेल्या अनेक वर्षात या भावना काहीशा प्रमाणात कमी झालेल्या आढळतात . हाच काळजीचा विषय आहे . राष्ट्रीयतेच्या मुल्यांचा ऱ्हास झाल्याचे पडसाद स्पष्टपणे दिसू लागले आहे . काही उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे - पाकिस्तान या देशात पदस्थ परराष्ट्र खात्याची एक महिला अधिकारीचे पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडले जाणे , काही भारतीय सैन्य व पोलिस अधिकाऱ्यांचे नक्षलवाद्यांना व मावोद्यांना शस्त्र पुरविले जाणे , भारतीय मुळच्या अफजल गुरुचे संसदेवर हल्ला करणे , आजही कोट्यावधी बांगलादेशियांचे खोटे भारतीय नागरिक बनून वावरणे आणि यात राजकारण्यांनी मदत करणे , अतिरेक्यांचे मोकाट फिरणे , नकली नोटांची भरमार , आणि याहून कळस म्हणजे देशाला पोकळं करून सोडणारा प्रचंड भ्रष्टाचार . हे सर्व भरभराटीवर आहे .जणू राष्ट्रातच राष्ट्राविरुद्ध रोज
नवनवे कटकारस्थान होत आहे . दुर्दैव म्हणजे यासाठीक अनेकवेळा मोठ्याप्रमाणात स्थानीय नागरिकांचा पाठींबा व मदत आढळते .
-राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती कमी होण्याच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण म्हणजे गेल्या ६५ वर्षात राजकीय पक्षांद्वारे आणि राजकार्ण्यांद्वारे घडवून आणलेले स्वार्थी संकीर्ण राजकारण . त्यामुळे राष्ट्रापेक्षा कोणीच मोठं नाही या भावने ऐवजी राष्ट्रापेक्षा आम्हीच सर्वात मोठे , महत्वाचे व राष्ट्र सर्वात नंतर या भावनांचा राजकारण्यांमध्ये खोल पर्यंत शिरकाव झालेला आहे .
-आपला देश धर्म निरपेक्ष म्हणून सर्वांनी स्वीकारला आणि त्याच दिवसापासून राजकारण्यांनी राष्ट्राला साम्प्रदायीक्तेच्या चष्म्यातून बघण्यास सुरवात केली . क्षेत्र विशेषचे , धर्मविशेषचे , जातीविशेषचे मत मिळावे म्हणून पक्षही बनले . शुद्ध स्वार्थाचे आणि एक दुसऱ्याला खालीपाडण्याचे राजकारण सुरु झाले . योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध
धर्मांधता व असहिष्णुता वाढविण्यात आली . चर्चेत राहण्यासाठी व मतांसाठी मुद्दे कायम राखण्याच्या कुत्सित वृत्तीमुळे नित्य नवे वाद निर्माण करून त्यांना सतत पेटते ठेवण्यात आले . आणखीन कमी वाटलं तर भाषे प्रमाणे प्रांत निर्माण केले .
-अतिरेक्यांचे वर्गीकरण आपल्या देशातच बघायला मिळते . अतिरेक्यांची कोणतीही जात किंवा धर्म नसतो , पण राजकारणी लोकांनी मतं मिळावी म्हणून कुत्सित वृत्तीने त्याचे वर्गीकरण मुस्लिम दहशतवाद आणि हिंदू दहशतवाद असे केल्याने दोन्ही धर्मांच्या निष्पाप लोकांना धक्का बसलाय . इतकेच काय तर नक्सलवाद आणि माओवाद यांचे वैचारिक वर्गीकरण केले . मिडीयाने या सर्वांचा प्रचार करण्यात मोलाचा हातभार लावला .
- जाणीव पूर्वक सर्व सामन्यांच्या मनात हे भरण्यात आलं की राष्ट्रापेक्षा धर्म आणि जाती हेच सुरक्षेची शाश्वती देऊ शकतात . कायदा सर्वात शेवटी मदतीसाठी आल्याचे दाखवितो . कोणीही यावं , काहीही करून जावं , कायदा काहीच करू शकणार नाही ही सर्व सामन्यांची भावना बलवती झालेली आहे . म्हणूनचकी काय आज सर्वसामान्यांना कायद्याच्या व्यवस्थेपेक्षा , किंबहुना स्वत:पेक्षाही स्वत:च्या सुरक्षिततेची अपेक्षा , धर्माकडून ,
जातीकडून , इतकचं नव्हे तर उग्रवादी संगठनांकडून आणि गुंड व माफियांकडून
असते . प्रकारांतराने राष्ट्राबद्दल उदासीनता वाढते ,आणि अनासक्ती निर्माण होते .
- राष्ट्रप्रेम , राष्ट्रभक्ती कमी होण्याचे आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे ,
" भ्रष्टाचार . " हरी अनंत हरी कथा अनंता , भ्रष्टाचाराची हीच गत झालेली आहे . आर्थिक भ्रष्टाचारा मुळे , समाजात उंदंडता , उश्रृंखलता अनाचार आणि गैरवर्तन वाढलेले आहे . आजतागायत देशात अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार पदरी पडलेला आहे व ही गंगोत्री अद्याप सुकलेली नाही . यामुळे श्रीमंत जास्तच श्रीमंत आणि गरीब जास्तच गरीब व लाचार झालेला आहे . देशातल्या दोन टक्के लोकांजवळ देशाची ९८ टक्के मालमत्ता आहे . म्हणून आर्थिक असमानता आणि असंतोष तीव्रतेने वाढत आहे . देशात ८० कोटी लोकांचे उत्पन्न या महागाईच्या भीषण काळात आजही २० रुपयांहून कमी आहे तर यातल्या ६४ कोटी लोकांना दहा रुपये रोजही उत्पन्न नाही . आता अन्न नाही , वस्त्र नाही , निवारा ही नाही . अशा लोकांना राष्ट्राबद्दल विचार करायला सांगणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणेच म्हणावे लागेल . येणाऱ्या काळात लोकांची उपासमार व असुरक्षा देशाच्या सुचारू व्यवस्थेसाठी फार मोठे आव्हान ठरणार आहे . मुलभूत अधिकारच नसतील तर असल्या दुर्बल व लाचारांकडून नागरिक कर्तव्यांची काय अपेक्षा ? शिवाय उपासमारी मुळे होणाऱ्या गुन्ह्यांमुळे कायद्याचे शासन सुरळीत असूच शकत नाही . गुन्हे वाढल्यामुळे लोकांची कायद्याबद्दल नकारात्मकता वाढते , न्याय व्यवस्थेवरचा विश्वास संपतो याचे दुष्परिणाम म्हणजेच राष्ट्राबद्दलची ओढ कमी होते .
- राष्ट्रप्रेम कमी होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे रोज नवनवीन कटकारस्थानं रचून भारतीय संस्कृतीवर आघात होणे .काळ बदलतो पण बाजारपेठ सजविण्यासाठी भारतीय भाषांवर , भारतीय राहणीवर , भारतीय सवयींवर , भारतीय परंपरांवर , भारतीय वस्तूंवर , भारतीय खानपानवर , भारतीय सणावारांवर , ज्या विकृत व उपहासास्पद पद्धतीने हल्ले केले जातात , आणि त्या हेय समजल्या जातात , त्यांचा एकमेव उद्देश
तरुण उप्भोक्तांच्या भावना भडकविणे आहे . भांडवलदारांद्वारा नवश्रीमंतांचा , मध्य व
उच्चमध्यम वर्गीयचा एक असा वर्ग तयार करण्यात आलेला आहे ज्याला उपभोक्ता संस्कृती पोषणाचे काम दिले असून त्यासाठी अहितकारी भारतीय संस्कृती , भारतीय मुल्य , भारतीय परंपरा , आणि सर्व भारतीय भाषांना जाणीव पूर्वक नष्ट करण्याचे काम देण्यात आलेले आहे . उद्योजक , नोकरशाह , व राजकारणी यांच्या संगनमताने हे कार्य गेल्या काही वर्षात खूप वाढलेले आहे . तरुणांची ,राष्ट्रातले सर्व फायदे घेऊन सुख सोयी उपभोगल्या नंतर परदेशात स्थयिक होण्याची लालसा इतरांना दिग्भ्रमित करते आणि सर्वांच्या नजरेत राष्ट्राचे महत्व कमी करविते . पैश्यांसाठी हा वर्ग सोयीस्कर रित्या राष्ट्राला विसरतो .
-भारतीय शिक्षण पद्धतीत हिंदी , संस्कृत ,आणि क्षेत्रीय भाषांसकट काही मूळ विषय जसे
अर्थशास्त्र , समाजशास्त्र , इतिहास , साहित्य इत्यादी असल्या राष्ट्राबद्दलची माहिती व जाणीव करविणाऱ्या विषयांची जाणीव पूर्वक उपेक्षा केली जाते . आणि असल्या विषयांना शिकण्याची व शिकविण्याच्या अनिच्छेमुळे राष्ट्रसंस्कृतीच्या मुळापर्यंत जाऊन
राष्ट्रमहत्वाचा व राष्ट्रमुल्यांचा अभ्यास होतंच नाही .
- इंग्रजी भाषाला जाणीव पूर्वक व्यवसायासाठी व शासनासाठी कारण नसताना महत्व पूर्ण दाखविले जाते . स्वातंत्र्याच्या वेळेसही दोन टक्के इंग्रजी जाणणारे लोकं ९८ टक्के इंग्रजी न जाणणाऱ्या लोकांवर शासन करत होते , आणि ६५ वर्षानंतरही इंग्रीजेचे इतके उदो उदो होत असूनही , आजही २ टक्के इंग्रजी जाणणारे ९८ टक्के इंग्रजी न जाणणाऱ्या लोकांवर शासन करत आहे . ९८ टक्के लोकांची इतक्या वर्षानंतरही गुलामीतून सुटका नाही .
- पाठ्यक्रमातून हिंदीसकट क्षेत्रीय भाषांच महत्व कमी करण्यात आलं . आज विदेशी संस्कृती शिकविणाऱ्या शाळा भरभराटीवर आहेत . सरकारी शाळा रिकाम्या असतात .सर्व उत्पन्न हिंदी व क्षेत्रीय भाषिकांपासून पण सर्व खर्च मात्र इंग्रजी भाषिकांसाठी , हल्ली असच धोरण आहे व्यवसायाचे . या मुळे देशात दोन वर्ग तयार झालेले आहेत . एक अशिक्षित , कुपोषित , लाचार आणि गरीब , जे देशात तर राहतात , पण राष्ट्राच्या अस्तित्वाची त्यांना जाणीवच नसते . दुसरीकडे धनाढय , आणि मॉलसंस्कृतीच्या आहारी जाऊन उधळपट्टी करणार वर्ग,जे राष्ट्र , राष्ट्रप्रेम , राष्ट्रभक्ती , असल्या शब्दांशी थोडं अंतरच बाळगून असतात .यांच्यासाठी फक्त पैसा महत्वाचा . हा वर्ग नेहमीच सर्व सुविधा आणि नागरिक अधिकारांचा सोयीस्कर पणे गैरवापर करतो व आपल्या कर्तव्यांना सदैव तिलांजली देऊन सुखाने नांदत असतो . यांना मतदानासाठी जाणे सुद्धा अपमानास्पद वाटते .यांच्या वागणुकीचा दुष्परिणाम इतरांवरही पडतोच .आणि यामुळे नैतिकतेचा ऱ्हास झालेला आहे व जीवनमूल्यही विकसित होण्याचे थांबले आहे .
आज धावपळीच्या जीवनात सामाजिक मूल्यांच्या विकासासाठी कोणाजवळही वेळ नाही आणि म्हणून देशाच्या एकात्मकतेसाठी नेहमीच एक आव्हान असते . .
-- राष्ट्रप्रेम कमी होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन .
आज घरात मुलांना नैतिकता , संस्कारमुल्य , प्रेम , त्याग , राष्ट्रप्रेम या सर्व उदात्त भावनांच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी आपुलकीने सांगणारे प्रेमळ आजीआजोबा घरात नसतात .म्हणून मुलांना या बद्दल काही कल्पनाच करता येत नाही . आज टीव्ही , मोबाईल , कम्युटर , बाईक , आणि विज्ञानाने दिलेल्या इतर सुखसोयी भोगण्यात सर्व माणुसकी गमावून बसलो आहोत आपण . पोरं देखील यात व्यस्त असतात . दिवसभर मुलं एकटे राहण्याने आत्मकेंद्रित होतात . इतरांचा विचार त्यांना करताच येत नाही मग सामाजिक बांधिलकीचा विचार त्यांना कसा करता येईल ? एकूण काय राष्ट्र प्रेमाचेही धडे त्यांच्या आयुष्यात नसतातच .
-मौजमजेची वृत्ती वाढल्यामुळे सेवाभावना संपुष्टात आलेली आहे . शासक वर्गाची मानसिकता उद्योजकांसारखी झालेली आहे . म्हणून राष्ट्रीयतेच्या नैतिक चिंतनात कमी आलेली आहे . आजही राष्ट्रीयपर्वांना होळी दिवाळी सारखा उल्हास आढळत नाही .
ज्या देशात वन्देमातरम साठी विवाद होतो त्या देशाला राष्ट्रीयते साठी अजून अनेक किती
अग्नी दिव्यांना सामोरे जायचे आहे , कोणालाच ठाऊक नाही .
- चिंतन संपल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे . वर्षातून नुसते एक दिवस
राष्ट्रगान म्हणून राष्ट्राचे कल्याण होत नसते . सिमेंटकांक्रीटच्या रस्त्यांवर अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांना पाहून एकच मनात येते - राष्ट्राने मागे राहू नये . प्रत्येकांमध्ये जवळीक रस्त्यांमुळे नाही तर भावनांमुळे असावी . - समाप्त -- मो - ९१९८९३१२५२४७
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY