लेखक -- विश्वनाथ शिरढोणकर , इंदूर म.प्र.
***********
--ताराबाईच्या शरीरातून प्राण निघाले . तिची या भवसागरातून एकदाची
सुटका झाली . ताराबाईच्या शरीरातून प्राण निघाले खरे पण तिच्या आत्म्याचे
काय ? भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे की मरतं ते शरीर . आत्मा कधीच
मरतं नाही आणि प्रत्येक शरीरात एक आत्मा असतोच . म्हणजे शरीर मरतं आत्मा
मरतं नाही . आणि आत्मा अमर असतो . तर मग आता ताराबाईचा अमर असणारा आत्मा
सध्या कुठे भटकत असेल ? कुठे भटकणार तो ? अजून तर याच घरात , नाही नाही
, याच खोलीत नक्की असणार . अजून तर प्रेत जमिनीवरच पडलेलं आहे .
शेजारपाजारचे बिलकुल हळू आवाजात , कुजबुज करीत पुढच्या व्यवस्थेला लागले
असल्याचे दाखवत आहे . ताराबाईचे या जगात कोणी सगेसोयरे आहेत का हे
कोणालाच ठाऊक नाही . या सोसायटीमध्ये सर्वांनी ताराबाईला एकटंच पाहिलं
आहे . एक बेडरूमच्या फ्लेटमध्ये नुकतीच राहायला आली होती . वय सुमारे
पन्नास वर्षे . काय करत होती कुणालाच काही माहित नाही . तसं ताराबाईच्या
घरात कधी कुणी आलेलंच नव्हतं , म्हणून कोणी ओळखण्याचा प्रश्न नव्हताच .
फक्त एक बाई घर कामासाठी यायची , तिनंच सकाळी आरडाओरडा करत सर्वाना
सांगितलं आणि मग सर्व लोक गोळा झाले . आता काय करायचे , हाच पेच सर्वांना
पडला होता .
--एकीकडे लोक कुजबुज करत होते तर दुसरीकडे ताराबाईचा आत्मा अजूनही कावरा
बावरा होऊन त्याच खोलीत मृत शरीराच्या चारीबाजूने घिरट्या घालत होता .
शरीरातून अचानक बाहेर यावं लागेल याची ताराबाईच्या आत्म्याला मुळी
कल्पनाच नव्हती . तसं शरीर जड झालं की हलकं झालं याच्याशी ताराबाईच्या
आत्म्याला आता काहीच घेणं देणं नव्हतं , तरीही तो सारखा विचार करीत होता
की आता काय करायचं ? पण येवढं मात्र नक्की की ताराबाईच्या आत्म्याला
सर्व दिसत होतं , सर्व कळत होतं . पण आपल्याला जसं सांगितलं जातं व
अनुभवंही आहे , की जे शरीर नश्वर असतं ते सर्वांना दिसतं , पण जो आत्मा
अमर असतो तो कोणालाच दिसत नाही . त्याच्याशी कोणी बोलूही शकत नाही .
आत्मा जे बोलेल तेही कोणाला ऐकूच येणार नाही . बरं तसं म्हणाल तर इथं
जिवंत माणसाचंच कोणी ऐकत नाही तर मेलेल्याला कोण विचारणार ? असो . तर
सांगायचं हे की असा हा ताराबाईचा आत्मा आपल्या स्वत:च्या हक्काच्या एक
बेडरूमच्या फ़्लेटमधे इतक्या अनोळखी माणसांना पाहून घाबरला . वर
ताराबाईच्या स्वत:च्या शरीराला जमिनीवर निष्प्राण पडलेलं पाहून आत्मा
जास्तंच गोंधळला . हेच शरीर . . . .हेच शरीर , याच शरीरापायी तिनं किती
त्रास सहन केला सांगणंच कठीण . आयुष्याला कंटाळून किती वेळा ताराबाईनं
या शरीराला संपविण्याचा प्रयत्न केला , पण नाही संपवू शकली ती या
शरीराला . आणि आज हे शरीर अचानक निष्प्राण झालं . खरं तर या शरीराला
जमिनीवर पडलेलं पाहून ताराबाईचा आत्मा प्रसन्न होता . ' चांगलं झालं .
फार त्रास सहन केला . पडून राहा अशीच .' ताराबाई चा आत्मा बडबडला .
--एका अनैतिक प्रेम संबंधापायी ताराबाईला हे शरीर मिळालं . स्वत:च्या
जन्मदात्रीने तिला म्हणजे एक दिवसाच्या ताराबाईला कचऱ्याच्या ढिगात टाकून
निष्ठुरतेने पोरकं केलं . खरं तर
एक दिवसाच्या ताराबाईचं शरीर समाजाला पहिल्याच दिवशी जड झालं होतं .
भटके कुत्रे खाणार होते तिचं शरीर , पण पहिल्याच दिवशी कोणीतरी रडण्याचा
आवाज ऐकला व पोलिसांना कळविलं . नंतर एक दिवसाची ताराबाई अगोदर
रुग्णालयात व नंतर अनाथ मुलींच्या वसतीग्रहात आली . या प्रकारे पहिल्या
दिवसापासून ताराबाईच्या शरीराची जी
हेळसांड सुरु झाली ती कधीच थांबली नाही .
-- " आपल्याला पोलिसांना कळवायला हवं . " कुणी तरी कोणाला तरी सल्ला दिला .
--- ताराबाईचा आत्मा चवताळला , ' मेल्यांनो , मी आता काहीच केलेलं
नाही . किती वेळा
पोलिसांना बोलवाल ? कामाठीपुऱ्यात पोलिसांनी अनेकदा माझ्यावर धाड घातलेली आहे .
ठाऊक आहे का तुम्हा सर्वांना ? हेच ते शरीर . होय हेच शरीर . . . हे
शरीर , पोलिसांनी अनेकदा कुस्करलेले आहे . . . . भामटे मेले ! निदान आता
तरी पोलिसांनी या शरीराला हात लावता कामा नये . '
-- ताराबाईचा आत्मा त्या मृत शरीराच्या पायथ्याशी होता . इथले कोडे
आत्म्याला काही
समजत नव्हते . जिवंतपणे ही पोलिस ; आणि मेल्यावरही पोलिस . ताराबाईच्या आत्म्याने
एकदा पुन्हा मृत शरीराकडे बघितलं , ' पण आता पोलिस कशासाठी ? जा बाबा
बोलवा त्यांना . जा . . . . पाहू या आता काय करतात ते या शरीराचं ?
ताराबाईचा आत्मा बोलत होता , पण
त्याचं बोलणं कोणालाही ऐकू येत नव्हतं .
-- " नाही , पोलिसांना तर बोलवाच , पण घरात कोणाचा काही पत्ता सापडतो
का तेही बघा .
एकादी टेलिफोन डायरी . . . . किंवा एकदा मोबाईल . . . म्हणजे लगेच
सर्वांना कळविता येईल . " कोणतरी बोललं .
-- ' डायरी . . . ' ताराबाईचा आत्मा एक क्षण घाबरला , ' डायरी सापडली तर
काही मंत्री ,
खासदार , आमदार आणि अनेक बडी मंडळी गोत्यात येतील . अगदी धर्मगुरू
म्हणविले जाणारे व पवित्र आत्मा घेवून फिरणारे सुद्धा . आणि बरं का .
. . सर्वाना सुधरविणारे
समाजसुधारकसुद्धा . ' ताराबाईचा आत्मा आता लोकांना ओरडून - ओरडून सांगत होता ,
' या शरीराला कोणीही सोडलेलं नाही . म्हणून असं करू नका . याने काहीच
होणार नाही .
डायरी मिळालीच तरी जवळचं कोणीही सापडणार नाही पण अनर्थ मात्र नक्की होईल . हेच
शरीर . . . हेच शरीर . . किती त्रास दिला या शरीराने . . . . ज्या
लोकांनी हे शरीर
ओरबाडलं . . . ज्या लोकांनी ताराबाईच्या मनावर घाव केले त्या सर्वांची
नावं समाजासमोर येतील . पण समाज गप्पच बसणार आहे ना ? आणि पोलिस तर ती
डायरीच लपवून त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं करून घेतील . मग बदनाम होईल
ती फक्त ताराबाई ! म्हणून असं
करू नका . ' ताराबाईच्या आत्म्याचा आर्त कोणालाही ऐकू येण्याचा प्रश्नच नव्हता .
-- " पण हिचा नवरा . . . पोरंबाळं . . . नातेवाईक . . . कुणीच कधी इकडे
हिच्याकडे आलेले बघितले नाही . कुणास ठाऊक कुठे आहेत ? आहेत की नाही ,
कळायला काहीच मार्ग नाही . "
कुणा एकच्या मनात सारख्या शंका कुशंका येत होत्या . राहवलं नाही म्हणून त्यानी
बोलून दाखविलं .
-- ' नवरा . . . . ? ' ताराबाईचा आत्मा आता दुखावला . आणि पुन्हा बोलू
लागला , . . .
' हिजडा मेला . अनाथ मुलींच्या वसतीग्रहाच्या त्या कारभाऱ्याने कसलाही
विचार न करता पैसे उकळून , पंधरा वर्षाच्या ताराबाईचे लग्न बळजबरीने एका
पंचेचाळीस वर्षाच्या निपुत्रिक पोक्त विधुर माणसाशी लावून टाकले .
लग्नाच्या पहिल्याच रात्री तो नामर्द म्हणाला , ' मी काहीच
करू शकत नाही .' मग हेच शरीर . . . हेच शरीर आणि मन सुद्धा कोरडंच
राहिलं रात्रभर . नंतर हे रोजचंच झालं . एक दिवस तो नामर्द ताराबाईला
म्हणाला , ' आई वडील व समजासमोर आपण नवरा बायको . माझ्यावतीने तू
स्वतंत्र आहेस . ' त्या रात्री ती त्याच्या चेहऱ्यावर थुंकली. तिनं
त्याला विचारलं , ' हे शरीर . . . हे शरीर कुठे नेऊ ? तो म्हणाला , '
' माझा एक मित्र आहे . त्याची तुझी ओळख करवून देतो . त्याचं माझ्यावर
बरंच कर्ज आहे . '
अनाथ मुलींच्या वसतीगृहाच्या कारभाऱ्याला दिलेली रक्कम त्याने आपल्या
मित्राकडून वसूल
केली आणि त्याच्या मित्राने ताराबाईकडून . ताराबाईचा आत्मा आपल्या
प्रेताच्या जवळ
बसून विलाप करीत होता . त्याचा आर्त कोणाला ऐकू येत नव्हता .
-- " डायरी नाही . . . . . मोबाईल पण नाही . कमाल आहे . कसं शोधायचं
नातेवाईकांना . . .
जवळच्यांना ? " कुणी एकाने पूर्ण घरंच एव्हाना हुडकून काढलं होतं .
त्याला काहीच सापडलं
नव्हतं .
--ताराबाईचा आत्मा आता पुन्हा फणफणला - ' कोण कोणाच्या जवळचं असतं रे ?
तुला काही ठाऊकच नाही . हेच शरीर . . . हेच शरीर . . . अरे या शरीराच्या
वासानेच लांडगे
जवळचे बनतात . मग तेच नातेवाईक असतात . मृत शरीरात कसला आलाय सुगंध ? कोण
ओळखणार आता ? ज्याने ताराबाईला तिच्या नवऱ्याकडून विकत घेतलं अशा , नवऱ्याच्या
मित्राची भावजय म्हणून ताराबाई सर्वांसमोर नांदत होती . पण प्रत्यक्षात
शरीराचंच नातं
होतं . त्याला ही तिचं ते शरीरच हवं होतं . हेच शरीर . . . हेच शरीर . .
. जळलं मेलं हे शरीर .
ताराबाईच्या एकुलत्या एक मुलाचा बाप , तिच्या नामर्द नवऱ्याचा हाच नालायक
मित्र होता .
पण समाजात तिच्या नवऱ्यालाच त्या पोराचा बाप होण्याचा मान मिळाला . नाव
मिळालं , मान मिळाला आणि वारसही मिळाला म्हणून ताराबाईचा नवराही तिचं
हेच शरीर आपल्या मित्राला सोपवून आनंदात होता . तिच्या मुलाला कोणी
कचऱ्याच्या ढिगात टाकलं नाही म्हणून ताराबाई सद्य परीस्थित समाधानी
होती . पण तिच्या व्यथेचं काय ? ती कोणाला काही
सांगू शकणार नव्हती . तिच्या मुलालाही ती कधी सांगू शकणार नव्हती की
त्याचा खरा बाप
कोण आहे .
--नवऱ्याला वारस मिळाल्यावर त्याला तिची गरज उरली नव्हती . स्वत:चे बिंग
उघडकीस येऊ नये व मित्राच्या वैवाहिक जीवनावरही ताराबाईमुळे पुढे
कोणते संकट येऊ नये म्हणून एक दिवस , देवदर्शनासाठी प्रवासाला
जाण्याच्या बहाण्याने तिचा नवरा व त्याचा मित्र तिला या
शहरात घेऊन आले व येथे कामाठीपुर्यात गुराढोरांना विकावं तसं तिचं शरीर विकून
चालते झाले . तिच्या पोराला पण तिच्या जवळून हिसकावून घेतले .
-- ' हेच शरीर . . . हेच शरीर परत एकदा विकलं गेलं होतं . नंतर रोज
रोज विकलं जाण्यासाठी पुन्हा पुन्हा सजणारं व सज्ज होणारं तिचं
सुगंधित शरीर . . . हेच शरीर . . . हेच शरीर ,पडलंय इथं जमिनीवर आता
धूळ खात . पाहा आता काही उपयोग होतो का या या शरीराचा ? '
ताराबाईच्या आत्म्याचे अश्रू कोणाल दिसणार होते ?
-- पोलिस आले . पंचनामा झाला . जवळचं कोणीच सापडलं नाही . शेवटी
पोलिसांनी सोसायटीच्या लोकांनाच अंत्येष्टीची परवानगी दिली . तिरडी
घेवून लोक बाहेर पडत होते .
ताराबाईचा आत्मा हे सर्व पाहात होता .
--' या शरीराला आता जाळणार . जाळायलाच हवं . किती जणांनी विटाळलेलं हे
शरीर . . .
माझ्याजवळ तर हिशेबच नाही . आजतागायत एकही चांगला माणूस भेटू नये म्हणजे
काय ? ' ताराबाईचा आत्मा आता मृत शरीराबरोबर धाऊ लागला .
--ताराबाईचे मृत शरीर स्मशानात आणण्यात आले . मृतदेह लाकडांवर
ठेवण्यात आला . एकाने अग्नि दिला आणि क्षणातच मृत शरीर धू धू करत जळू
लागलं . ज्वाला वाढू लागल्या .
ताराबाईचा आत्मा आपल्या या जन्माच्या शरीराला जळताना पाहत होता .
-- ' आता हे चक्र थांबलं पाहिजे . ' ताराबाईचा आत्मा विचार करू लागला ,
' अमर असणं म्हणजे काय असतं ? ताराबाईच्या शरीरानं येवढं सोसलं , कमीत
कमी तिचं नावतरी या
जगात अमर व्हायला पाहिजे होतं . आणि या शरीराने पन्नास वर्ष जे भोगलं
त्याचा त्रास
आत्म्याला सुद्धा भोगावाच लागला नं . पण मग एकट्या शरीरालाच शिक्षा का ?
' ताराबाईच्या
आत्म्याने एक निर्णय घेतला घेतला . , ' आता खरंच पुरे . हे
जन्मजन्मांतराचे चक्र इथचं
थांबायला हवं . नको असले जन्म ! मीही या शरीराबरोबर स्वत:ला नष्ट करणार . '
-- उदिग्न होऊन ताराबाईच्या आत्म्याने अचानक अग्नित उडी घेतली . पण तो लगेच
बाहेर फेकला गेला . ' मला स्वत:ला संपवायचंच आहे . ' हा विचार करत
आत्म्याने दुप्पट
जोमाने पुन: अग्नित उडी घेतली . पण तितक्याच वेगाने तो परत बाहेर फेकला गेला .
आवेशाने त्यानं बऱ्याच वेळा अग्नित उडी घेतली पण तितक्याच वेगाने दर वेळेस तो
बाहेर फेकला जात होता . आता ताराबाईच्या आत्म्याला भगवतगीतेत दिलेला श्रीकृष्णाचा
उपदेश आठवला - आत्मा कधी मरत नसतो . आत्मा अमर असतो . ' अशा प्रकारे
ताराबाईच्या आत्म्याने एक अग्निपरीक्षा दिली व एका अग्निदिव्यातून बाहेर आला आणि
कंटाळून व निराश होऊन पिंपळाच्या एका फांदीवर जाऊन बसला .
-- गेली पन्नास वर्ष सोबत असलेल्या त्या मृत शरीराला राख होताना
पाहण्याशिवाय ,ताराबाईच्या आत्म्याजवळ काही पर्याय नव्हता . शरीर राख
झालं . ताराबाईच्या आत्म्याला प्रश्न पडला , आता कुठे जायचं ?
ताराबाईचा आत्मा
मग स्वत:लाच म्हणाला , ' किती जन्म घ्यायचे ? आता कंटाळा आला . काही
काळ विश्रांती घ्यायला हवी . आता थोडे मृत्यूचे सुख भोगायला हवे .
'
-- ताराबाईच्या आत्म्याने देवाजवळ प्रार्थना केली , ' हे देवा ,
मला ताराबाईचे शरीर का दिलेस ? तिच्या शरीराच्या आत असूनही मी तिची
कोणत्याही संकटान मदत करू शकलो
नाही . . खरंच स्त्री जन्म फारच धोक्याचा ! हे देवा , तूर्त आता
पुनर्जन्म नको . काही काळ मला ताराबाईच्या मृत्यूचे सुख भोगू दे
!!!!*समाप्त
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY